शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
सेवा शुल्काची आकारणी आता पनवेल महापालिका करणार
पायाभूत सुविधांचे ‘सिडको'तर्फे पनवेल महापालिकेला हस्तांतरण
नवी मुंबई ः पनवेल महापालिका क्षेत्रांतर्गत सेवा शुल्काची आकारणी करणे आणि पायाभूत सुविधांचे ‘सिडको'तर्फे पनवेल महापालिकेला हस्तांतरीत करण्याबाबतचा सामंजस्य करारनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आदान-प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, आमदार प्रशांत ठावूÀर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांंच्यासह सिडको
आणि पनवेल महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
‘सिडको'तर्फे नवी मुंबई क्षेत्रात नवीन पनवेल (पूर्व) आणि (पश्चिम), काळुंद्रे, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे आणि खारघर नोड पायाभूत सुविधांसह विकसित करण्यात आले आहेत. पनवेल महापालिकेच्या निर्मितीनंतर सदर नोड आणि तेथील पायाभूत सुविधा पनवेल महापालिकेला हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे नागरिकांना उच्च दर्जाच्या नागरी सुविधा सुलभतेने प्राप्त होणार आहेत.
‘सिडको'ने मुख्यतः सर्व सोयी, सेवा आणि सुविधांवर भर देऊन पनवेल महापालिका क्षेत्रात स्वयंपूर्ण तसेच परिपूर्ण नोडस् विकसित केले असून यापुढे या सुविधांना सुरळीत आणि अखंडपणे सेवा पुरवण्याची जबाबदारी आता पनवेल महापालिकेची असणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्तांतरण समारंभप्रसंगी सांगितले. तर ‘सिडको'कडून पनवेल महापालिकेला सेवा हस्तांतरीत करण्यात आल्यामुळे पनवेल महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास हातभार लागून भविष्यकाळातील नियोजन सुरळीतपणे करण्यास निश्चितपणे मोठा हातभार लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शहरे वसविणाऱ्या ‘सिडको'ने नेहमीच या शहरांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यास प्राधान्य दिले आहे. याच अनुषंगाने या सुविधांचे हस्तांतरण करण्यात आले आहे. यापुढे आता सिडको नगरविकासातील नवनवीन शिखरे पादाक्रांत करेल. -डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक-सिडको.
सिडकोनिर्मित पायाभूत सेवा सुविधांचे हस्तांतरण...
पनवेल महापालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, पावसाळी गटारे, पदपथ, होल्डींग पॉन्डस्, दफनभूमी, स्मशानभूमी, समाज मंदिरे, अग्निशमन केंद्रे, सार्वजनिक कार्यक्रम, दैनिक बाजारपेठ आणि अन्य वापरांसाठीचे भूखंड, मलनिःस्सारण वाहिन्या आणि विद्युत सेवा या पायाभूत सुविधा पनवेल महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आल्या असून त्यासंदर्भातील करारनामा करण्यात आला आहे. त्याचबरोबर महापौर-आयुक्त निवास आणि पनवेल महापालिका कार्यालयासाठीचे भूखंड देखील हस्तांतरीत करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने १ नोव्हेंबर २०२२ पासून ‘सिडको'ने पनवेल महापालिका क्षेत्रात सेवा शुल्क आकारणे बंद केले आहे. त्यामुळे या नोडस्च्या विकास आणि देखभालीची संपूर्ण जबाबदारी आता पनवेल महापालिकेची राहणार असल्याचे ‘सिडको'तर्फे स्पष्ट करण्यात आले.