जागतिक महिला दिन वाशीमध्ये पार पडला कर्तबगार महिलांचा कौतुक सोहळा  


महिला दिनानिमित्त वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात महिलांची जागृती व काव्य जागर कार्यक्रमाचे आयोजन

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे व प्रा.माणिकराव कीर्तने वाचनालय, वाशी,  यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात महिलांची जागृती व काव्य जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना फक्त शुभेच्छा न देता सर्वार्थाने महिलांमधील गुणवान, यशवंत, कर्तबगार महिलांचा कौतुक सोहळा देखील पार पडला.  

या कार्यक्रमाचे उद्घाटन नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुंबई विभाग ग्रंथालय सहाय्यक संचालक शालिनी इंगोले यांनी भूषविले. नवी मुंबईतील प्रसिद्ध कवियत्री तथा नवकवीयत्रींनी संवाद नात्यांचा-कविता डॉट कॉम या अनोख्या कार्यक्रमाद्वारे महिलांच्या विविध भावनांचे कंगोरे सहज उलगडून सभागृहाला मंत्रमुग्ध केले.  

महिला दिनाचे उद्दिष्ट विशद करताना महिलांनी व्यक्त व्हायलाच हवा हा संदेश अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी यावेळी दिला. तर महाराष्ट्र सरकार महिलांसाठी राबवीत असलेल्या योजनांचा शालिनी इंगोले यांनी आढावा घेतला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी ठाणे जिह्यातील ग्रंथालयाचा लेखाजोखा मांडताना प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालयाच्या सहयोगाबद्दल कौतुकोद्गगार काढले. वाचनालयातर्फे बोलताना प्रा.अश्विनी बाचलकर यांनी महिलांचा सर्व प्रांतातील वावर हा जागर सदैव असाच राहावा अशा शुभेच्छा दिल्या.

जागतिक महिला दिन आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, समाजसेवा, कला, हॉस्पिटल, परिवहन इत्यादी अनेक क्षेत्रात विशेष कार्य करणा-या नवी मुंबईतील 100 महिलांचा खास सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी यांनी आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावित्री मेधातूल यांनी केले.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन'मध्ये ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते बक्षीस वितरण