नवी मुंबई महापालिका क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान

महिला दिनाचा आनंदोत्सव महिलांकडून उत्साहात साजरा

नवी मुंबई ः महिला आज सर्वच क्षेत्रात धडाडीने आघाडीवर असून अनेक क्षेत्रात तिने स्वतःचे अस्तित्व समर्थपणे सिध्द केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या मधल्या कालखंडानंतर होत असलेला महिला दिन आपल्या सावित्रीच्या लेकींचा हक्काचा आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस असल्याचे मत नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई महापालिका समाजविकास विभागाच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित जागतिक महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी सुजाता ढोले मनोगत व्यक्त करीत होत्या. याप्रसंगी समाजविकास विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, रंजना सोनावणे, शशिकला पाटील, हेमांगी सोनावणे, माजी उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, संध्या अंबादे, कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत तायडे, दत्तात्रय घनवट, समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये समाजविकास विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी विभागाच्या वतीने महिला तसेच इतर समाज घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून यावर्षी योजनांमध्ये तृतीय पंथीय घटक, शरीर विक्री करणाऱ्या महिला, आदिवासी घटक याकरिता राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची भर घालण्यात आली असल्याचे सांगितले.

यानिमित्त शंभरहून अधिक महिला बचत गटांनी, महिला संस्थांनी निर्माण केलेल्या विविध उपयोगी वस्तू, साहित्य यांचे प्रदर्शन विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या पॅसेजमध्ये मांडणी करुन ठेवण्यात आलेले होते. त्यालाही महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित नाटक लोक-शास्त्र सावित्री सादर करण्यात आले. लेखक, दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विचारप्रवर्तक नाटकाला महिलांनी प्रचंड दाद दिली. नाटक संपल्यानंतर प्रातिनिधीक स्वरुपात अनेक महिलांनी सखोल विचार करायला भाग पाडणारा नाट्यप्रयोग अशा शब्दात रंगमंचावर येऊन अभिप्राय व्यक्त केले. दिग्दर्शक मंजुल भारव्दाज यांच्यासह कलावंत अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर यांचाही याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, परिचारिका श्वेता वराडे, शिक्षिका समिक्षा लोट, सविता घुले, महिला पोलीस कर्मचारी शर्मिला नाईक, महिला सफाई कामगार शांता तांडेल, संगिता पगारे, वृषाली कांबळे, नंदा कुलये, शोभा उबाळे, चौरी पाटील, नंदा बच्छाव, सिताबाई जाधव तसेच महिला लिंकवर्कर सारिका डोहाळे, रंजिता घरत, विद्या आलदार, स्वाती जाधव, शोभा कोकरे, कल्पना मोरे, रेश्मा कोंडे, शीला मोरे या विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्ष वृषाली मगदुम यांनाही सन्मानित करण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहतुक पोलिसांचा मदर तेरेसा यांच्या प्रेमदान या अनाथ आश्रमातील महिलांसोबत जागतिक महिला दिन साजरा