महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून 59 लाख कुटुंब जोडली गेली, 5 लाख 97 हजार बचत गट कार्यरत

महालक्ष्मी सरस ही बचत गटांसाठी सुवर्ण संधी -ग्राम विकास व पंचायत राजमंत्री गिरीश महाजन

नवी मुंबई : ‘महालक्ष्मी सरस’ बचत गटांच्या उत्पादीत वस्तूंना मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची एक सुवर्णसंधी आहे. मुंबई आणि नवी मुंबईच्या जनतेने महालक्ष्मी सरसला भेट देऊन बचतगटातील उत्पादीत वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

जागतिक माहिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील वाशी एक्झीबीशन सेंटर येथे “महालक्ष्मी सरस प्रदर्शन-2023” च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 8 ते 19 मार्च 2023 या कालावधीत ग्रामीण भागातून आलेल्या बचतगटांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ, गृहउपयोगी साधन सामग्रीच्या विक्रीचे प्रदर्शन असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनचे उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. महाजन यांनी प्रदर्शनाची पाहणी केली व स्टॉलला भेटी देऊन स्टॉलमध्ये विक्रीकरिता ठेवण्यात आलेल्या वस्तू व पदार्थांची माहिती घेतली.

या सोहळ्याप्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार मीना, एकात्मिक महिला बाल विकास आयुक्त रुबल गुप्ता, ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक राजाराम दिघे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उपायुक्त (विकास) कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, गिरीश भालेराव, उमेद अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, पोलीस अधिक्षक संगिता अल्फान्सो तसेच महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून आलेल्या बचत गटांच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलनाने उद्घटन सोहळ्याचा शुभारंभ झाला.राज्यमंत्री गिरिष महाजन उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले की, कोराना महामारीमुळे मागील दोन-तीन वर्षे महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा कार्यक्रम करता आला नाही.  परंतु यावर्षी मिळालेल्या संधीचे सोन करता येईल असे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. शेवटच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात 16 कोटी पर्यंत आर्थिक उलाढाल झाली होती. या वर्षी 25 कोटीचे किंवा त्यापेक्षा जास्त उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून 59 लाख कुटुंब जोडली गेली आहेत. 5 लाख 97 हजार बचत गट कार्यरत आहेत. 4 लाख 50 हजार बचत गटांना आतापर्यंत 18 हजार कोटी पर्यंत बँकांनी कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण महिलांना चूल आणि मुल या चौकटीतून बाहेर काढून त्यांना स्वत:च्या पायावर उभ करुन त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. असे  महाजन यांनी यावेळी सांगितले.  काही बचत गट हे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करत आहेत. त्यांचे भांडवलही त्याप्रमाणे कोटी रुपयांमध्ये आहे. अशा बचत गटांबद्दल अभिमान व्यकत करत महाजन यांनी यावेळी त्यांचे कौतुक केले. बँकांमार्फत बचत गटांना कर्ज उपलब्ध करुन दिले जाते या कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणे गरजेचेअसून या कर्जातून उपलब्ध झालेला निधी बचत गटाच्या विकासासाठी आणि व्यवसाय वृध्दीसाठी उपयोगात आणावा. असा सल्लाही यावेळी महाजन यांनी उपस्थित बचत गटांना दिला.

महाजन पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध कामांमध्ये बचत गटांची मदत घेता येऊ शकते. शासनाच्या आरोग्य विभागाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिध्दी, ग्रामीण व शहरी भागातील घरपट्टयांची वसूली अशा कामाकरिता बचत गटांची मदत घेता येऊ शकते. दरवर्षी 8.6 टक्क्याने वाढणाऱ्या स्तन कर्क रोगा विषयीच्या जनजागृतीसाठी देखील बचत गटांची मदत घेणार असल्याचे महाजन यांनी यावेळी नमूद केले.

ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांनी देखील जागतीक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महालक्ष्मी सरस विषयी माहिती दिली. मीना म्हणाले की, बचत गटांमार्फत तयार करण्यात आलेल्या उत्पादनांना कायम स्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रत्येक तालुका आणि जिल्हयाच्या ठिकाणी शॉपिंग मॉल तयार करण्याचे प्रयोजन करण्यात येत आहे. बचतगटांच्या नवनवीन नावीन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देऊन त्यांना प्रशिक्षणाव्दारे अधिकाधिक सक्षम करण्याचे काम करण्यात येत आहे.

उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी प्रास्ताविक भाषणात महालक्ष्मी सरस मुळे बचत गट आर्थिक दृष्टया कसे सक्षम झाले याबाबत माहिती दिली. राऊत म्हणाले की, ग्रामीण भागातील 6 लाख बचत गट 3 कोटी जनतेपर्यंत पाहोचले आहेत.  आतापर्यंत बचत गटांनी बँकांकडून 5 हजार कोटी पर्यंत कर्ज घेतले असून त्यापैकी 4 हजार 900 कोटी रुपयांची परतफेड बचत गटांमार्फत करण्यात आली आहे.

यावेळी राज्य मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते महालक्ष्मी सरस विषयी सविस्तर माहिती असलेली सरस माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत सरस प्रदर्शनाशी जोडलेल्या सर्व बचत गटांचे संपर्क क्रमांक व इतर अनुषंगिक माहिती उपलब्ध आहे. आर्थिक साक्षरता माहिती पुस्तिका, लिंगभाव समानता जनजागृती माहिती पुस्तिका, लेखा परीक्षकांकरिता प्रशिक्षण पुस्तिका या विविध विषयांवरील माहितीपूर्ण पुस्तिकांचे प्रकाशन मंत्री महाजन यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित महिलांना यावेळी गुलाबी फेटे बांधण्यात आले होते. गुलाबी फेटे घातलेल्या महिलांमुळे कार्यक्रमस्थळी नारी शक्तीचे विराट रुप दिसत होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ विभागामध्ये कोट्यांवधीची वीजचोरी उघड करण्यामध्ये महिला अभियंत्याचे मोलाचे योगदान