सत्याग्रह महाविद्यालयात परिसंवाद संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयात परिसंवाद संपन्न

खारघर ः जागतिक महिला दिनानिमित्त खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयातस्त्री हक्क आणि सामाजिक संस्थांची जबाबदारी या विषयावर प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवाद प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी परिसंवादाचे उद्‌घाटन प्रा.  वनिता सुर्यवंशी यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई आंबेडकर, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला वंदन करुन केले. प्रा. डॉ. निधी पटेल, प्रा. एलोरा मित्रा, प्रा. संगीता जोगदंड, प्रा. ललिता यशवंते, प्रा. सुनिता वानखेडे यांनी परिसंवादात देश हितासाठी महिलांचे सबलीकरण आवश्यक असल्याचे विचार मांडले.

जी-२० देशामध्ये समान कामास समान दाम स्त्रियांना मिळत नाही. कौटुंबिक छळ, हिंसा, लैंगिक अत्याचार आणि शोषण, दर्जेदार आरोग्य, पुनरुत्पादन आणि मानसिक आरोग्य सेवा आणि बालसंगोपन आदिबाबत स्त्रियांना भेदभावास सामोरे जावे लागते. त्याचे निरसरण करण्याची संधी भारताला जी-२०च्या नेतृत्वाने मिळाली असल्याचे प्रा. संगीता जोगदंड म्हणाल्या. प्रा. एलोरा मित्रा यांनी भारतात महिलांची टक्केवारी ५० टक्के असताना लोकसभेत केवळ ४ ते १४ टक्के, सर्वोच्च न्यायालयात २ टक्के आणि प्रशासकीय सेवेत २७  टक्के
प्रमाण असमतोल असल्याची  खंत व्यक्त केली.

भारतीय स्त्रियांनी संविधान हेच सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानून वागले पाहिजे. निवडणुकीमध्ये जाती धर्मापेक्षा संविधानिक नितीमत्तेचा अंमल करणारा पक्ष आणि उमेदवाराला संधी दिली पाहिजे. परिसंवादाचे अध्यक्ष जेष्ठ विचारवंत डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी स्त्रियांना सर्वस्तरावर आणि सर्व प्रकारचे शिक्षण मोफत देण्याची आवश्यकता असल्याचे मत स्पष्ट केले.

सदर कार्यक्रमात सत्याग्रह अध्यापक महाविधालय, सिध्दार्थ हायस्कूल , अजिंठा स्कूल, डॉ. जी. के. डोंगरगावकर स्कूल,  आदिंचे शिक्षक सहभागी होते. प्रा. सोनाली सुर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून 59 लाख कुटुंब जोडली गेली, 5 लाख 97 हजार बचत गट कार्यरत