भांडूप परिमंडलात ‘लाईनमन दिवस' उत्साहात साजरा

लोकांच्या जीवनात उजेड आणणारे प्रकाशदूत ‘महावितरण'चा कणा -चंद्रकांत डांगे

ठाणे ः ऊन असो, वादळ असो किंवा पाऊस असो कोणत्याही कठीण परिस्थितीत स्वतःला झोकून काम करणारा माणूस म्हणजे ‘महावितरण'चे जनमित्र. स्वतःच्या घरी अंधार असेल तरीही दुसऱ्यांच्या घरी उजेड आणण्यासाठी तत्पर असणाऱ्या जनमित्र ‘महावितरण'चा कणा आहे. प्रत्येक ग्राहकांना अखंडीत वीजसेवा देण्यासाठी जनमित्राचे समर्पण अतुलनीय आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यात उजेड आणणाऱ्या जनमित्रांना सलाम, अशा प्रोत्साहनात्मक शब्दात ‘महावितरण'चे कोकण प्रादेशिक विभाग सह-व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी सर्व जनमित्रांना संबोधित केले.

 ४ मार्च रोजी भांडुप परिमंडळातील विविध कार्यालयात लाईनमन दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. भांडुप परिमंडल आणि ठाणे मंडळाने संयुक्तपणे विकास कॉम्प्लेक्स उपविभागीय कार्यालयात सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ‘महावितरण'चे कोकण प्रादेशिक विभाग सह-व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे बोलत होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) राजेंद्र पांडे, भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, भांडुप परिमंडलाच्या सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं.) सौ. हविषा जगताप, कार्यकारी अभियंता (प्रशा) देवेंद्र उंबरकर, ठाणे २ विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन थिटे, ठाणे चाचणी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय पाटील, इतर वरिष्ठ अधिकारी आणि लाईनमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच वीज अशी आज मानव जीवनाची मूलभूत गरज बनलेली आहे. अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी आपले जनमित्र अत्यंत खडतर परिस्थितीत काम करुन ग्राहकांच्या वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत असतात. त्यांच्या या अविरत मेहनतीसाठी देशभरातील लाईनमन बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय स्तरावर ४ मार्च रोजी लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता नितीन थिटे यांनी केले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लाईनमन यांनी घेत असलेली मेहनत आणि परिश्रम दर्शाविण्यासाठी एक सुंदर चित्रफित सहा. अभियंता सौ. प्रणाली घोरडे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ विशालसारंग यांनी सादर केली. त्यानंतर वीज हाताळताना महत्वाची काळजी घेण्याबाबतचे संगणकीय प्रस्तुतीकरण अति. कार्यकारी अभियंता जगदीश जाधव यांनी केले. यावेळी पुष्प आणि भेटवस्तू देऊन सर्व जनमित्रांचा गौरव करण्यात आला.

यावेळी काही महिला आणि पुरुष लाईनमन यांनी देखील त्यांचा कामाबाबत अनुभव कथन केले. तसेच पहिल्यांदाच साजरा करण्यात येणाऱ्या लाईनमन दिवसाबद्दल आनंदही व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी वीज सुरक्षेची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे मंडळाचे उच्चस्तर लिपिक दिलीप वाघमारे यांनी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सत्याग्रह महाविद्यालयात परिसंवाद संपन्न