आ.गणेश नाईक यांची महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत बैठक

शिक्षण, आरोग्यावर महापालिका करणार वाढीव खर्च

नवी मुंबई ः नवी मुंबईच्या विविध प्रश्नांवर आमदार गणेश नाईक यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत ४ माच रोजीबैठक झाली. सदर बैठकीत आयुक्त नार्वेकर यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आमदार नाईक यांनी कोणत्याही शहराच्या विकासासाठी तेथील शिक्षण आणि आरोग्य या दोन बाबींवर वाढीव खर्च झाला पाहिजे असे मत मांडले. महापालिकेच्या यंदाच्या एकूण अर्थसंकल्पाच्या शिक्षणावर ३ टक्के तर आरोग्यावर ४.५ टक्के तरतूद केली आहे. त्यामुळे तरतूद वाढविण्याची सूचना त्यांनी केली. लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रभागातील नागरी सुविधांची कामे हाती घेण्याविषयी महापालिकेकडे मागणी केली होती.  त्याअनुषंगाने काही कामे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात येणार आहेत. कामांची व्यवहार्यता तपासून निर्णय घेण्यात येईल, असे आयुवत नार्वेकर यावेळी म्हणाले.

नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधून अनेक शिक्षक आजही कंत्राटी पध्दतीने काम करीत आहेत. मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यात आली आहे. परंतु, त्यांना रुजू करुन घेण्यात आलेले नाही. शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळायला हवे. शिक्षकांसंबंधी यासह इतर अन्य महत्त्वाच्या मागण्या आमदार नाईक यांनी आयुक्तांसमोर ठेवल्या. तसेच सदर सर्व प्रश्नांवर संबंधित शिक्षकांसोबत एक सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाकडून प्राप्त करुन घेण्याच्या परवानग्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन नाईक यांनी यावेळी दिले.

महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयासह अन्य सर्व रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अनेक कर्मचारी वर्षानुवर्ष कंत्राटी पध्दतीने आणि ठोक पगारावर काम करीत आहेत. या कामगारांना देखील कायमस्वरुपी केले पाहिजे. या कामगारांनी त्यांच्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष रुग्णसेवा करण्यामध्ये घालवली आहेत आणि त्यामुळे त्यांना न्याय
मिळाला पाहिजे. शिक्षण आणि आरोग्य खातातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. कंत्राटी, ठोक मानधनातील कर्मचाऱ्यांना कायम करणे, वेतन वाढ देणे असे काही महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी नाईक यांनी केली. यासंबंधी देखील परिवहन कर्मचारी, त्यांची संघटना आणि महापालिका प्रशासनाची सर्वसमावेशक बैठक घेण्याची सूचना त्यांनी केली. सदर बैठकीप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका सौ. नेत्रा शिर्वेÀ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

उड्डाणपुलांच्या खालील अस्वच्छता होणार दूर...
शहरातील विविध ठिकाणच्या उड्डाणपुलाखालील जागेत अस्वच्छता पसरली आहे. अनेक ठिकाणी भिकारी, गर्दुल्ले बसलेले असतात. देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळवणाऱ्या नवी मुंबईला सदर बाब भूषणावह नाही. त्यामुळे उड्डाणपुलाखालील परिसर स्वच्छ ठेवावा. त्या ठिकाणी कोणी प्रवेश करणार नाही यासाठी जाळ्या बसवाव्यात. ज्याप्रमाणे पामबीच मार्गावर रस्ते दुभाजकामध्ये नागरिकांकडून फेकला जाणारा कचरा उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याच धर्तीवर बेलापूर पासून ते दिघा पर्यंत रस्ते दुभाजक कचरामुक्त राहण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी,  अशी सूचना देखील आमदार नाईक यांनी केली. अनेक ठिकाणी रस्ते दुभाजकामधील जाळ्या तुटल्या असून त्या दुरुस्त कराव्यात अथवा नवीन बसवाव्यात, असेही ते म्हणाले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘खारफुटी-पाणथळ समिती'च्या बैठकांना पर्यावरण विभागाचे अधिकारी गैरहजर