तुर्भे विभाग कार्यालयाची धडक कारवाई

तुर्भे स्टोअर येथे सव्वा दोन टन प्लास्टिक साठा जप्त

नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण विषयक आढावा बैठकीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्लास्टिक पिशव्या आणि एकल वापरातील प्लास्टिकचा वापर रोखण्याच्या दृष्टीने असे प्लास्टिक विक्री तसेच वापरासाठी नवी मुंबईत आणलेच जाऊ नये याकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले होते. या अनुषंगाने आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपीएमसी मार्केट परिसराकडे तुर्भे विभाग कार्यालयामार्फत विशेषत्वाने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यामध्ये तुर्भे स्टोअर येथील राज मार्केटींगच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या आणि प्रतिबंधित प्लास्टिक साठा असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती.

त्यानुसार महापालिकेच्या पथकाने गोडाऊनवर अचानक धाड टाकत तब्बल २३८५ किलो प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त केला. तसेच संबंधितांकडून पहिल्यांदा गुन्हा असल्याने ५ हजार रक्कमेची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तुर्भे विभागाचे विभाग अधिकारी भरत धांडे यांनी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली कनिष्ठ अभियंता राज नागरगोजे, स्वच्छता निरीक्षक महेंद्र रोडे, सिध्दू पुजारी, योगेश पाटील आणि सुरक्षारक्षक कामगार यांच्यासह धडक कारवाई केली. कारवाईत आढळलेला प्लास्टीक साठा जप्त करुन त्याची नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी क्रशर मशीन द्वारे विल्हेवाट लावण्यात आली.
किरकोळ वापरातील प्लास्टिक प्रतिबंधासाठी कार्यवाही करण्याप्रमाणेच प्लास्टिकची विक्री आणि वापर रोखण्यासाठी आता महापालिकेने प्रतिबंधातील प्लास्टिकच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या साठ्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. सर्वच विभाग कार्यालयांमार्फत धडक कारवाया सुरु करण्यात आलेल्या आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

होळीला लागणाऱ्या तांदूळ पापडीची कला लोप पावत चालली