तुर्भे विभागात अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करतांना राजकीय दबाव

तुर्भे येथे राजकीय दबावामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईला "खो"

तुर्भे - तुर्भे विभाग कार्यालयाच्या क्षेत्रात अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करतांना राजकीय दबाव येत आहे. त्यामुळे फेरीवाला हटाव मोहिमेला काही भागात खिळ बसली आहे. सानपाडा, जुईनगर, तुर्भे, कोपरी गाव आदी ठिकाणी पुष्कळ प्रमाणात फेरीवाले वाढले आहे.

तुर्भे विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त म्हणून भरत धांडे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई चालू केली होती. त्यामुळे एपीएमसी फळ मार्केट ते भाजी मार्केट या मार्गावरील पदपथ पादचाऱ्यांना चालण्यासाठी उपलब्ध झाले आहे. अन्य काही ठिकाणीही नियमितपणे कारवाई चालू आहे. या कारवाईचा काही राजकीय पक्षांनी धसका घेऊन  कारवाईला स्थानिक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध चालू केला आहे. तसेच प्रशासनावर दबाव आणायला प्रारंभ केला आहे. त्यामुळे काही ठिकाणी फेरीवाला हटाव मोहिमेला खिळ बसली आहे.

सानपाडा सेक्टर ३,४,५, तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, सानपाडा रेल्वे स्थानक, मोराज, सिटी मॉल जवळील सर्व्हिस रोड, जुईनगर सेक्टर २४,२५, कोपरीगाव, तुर्भे नाका ते फायझर रोड या सर्व ठिकाणी फेरीवाल्यांनी पदपथावर बस्तान मांडले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे.
एपीएमसी सिग्नल ते सिटी मॉल पर्यंत बसणारे सलूनवाले (फुटपाथवर केस कापणारे) , कांदे बटाटे विक्रेते यांच्यावर कधीतरी थातुरमातुर कारवाई केली जाते. अतिक्रमण विरोधी विभागाच्या कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच हे व्यवसाय चालू करतात. या ठिकाणी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता 'विजयी' मुद्रेने हप्ता घेऊन खालपासून वरपर्यंत सर्वाना 'संतुष्ट' करत असल्याची चर्चा आहे. त्यातही एखाद्या खमक्या अधिकाऱ्यांने या फेरीवाल्यांंवर कारवाई केली की 'ताई' चा दबाव येत असल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. अशीच परिस्थिती एपीएमसी सिग्नल ते महावीर सेंटर बिल्डिंग समोरील पदपथावरील फेरीवाले आणि नाल्यावरील मसाला मार्केट मध्ये जाण्याच्या गेट लगत बसणारे फेरीवाले यांच्याकडून इंजिनवाले हप्ता घेत असल्याचे बोलले जाते.  

एपीएमसी फळ मार्केट ते भाजी मार्केट च्या पदपथावर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते; मात्र त्याच्या बाजूला असलेल्या वरील फेरीवाल्यांवर नियमितपणे कारवाई होत नसल्याने या कारवाई मध्ये दुजाभाव केला जात आहे. याकडे नवनियुक्त विभाग अधिकारी भरत धांडे यांनी लक्ष घालून पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ मोकळे करून घ्यावे, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे विभाग कार्यालयाची धडक कारवाई