नवी मुंबई शहरात मागील दोन महिन्यांपासून प्रदूषणाच्या पातळीत दिवसेंदवस वाढ

नवी मुंबई मधील प्रदूषणाचा नवीन विक्रम स्थापित

वाशी ः नवी मुंबई शहरात मागील दोन महिन्यांपासून हवा प्रदूषणाच्या पातळीत दिवसेंदवस वाढ होत चालली आहे. तर ३ मार्च रोजी यात आणखी वाढ होऊन वाशी विभागात ४०१ (एक्युआर) हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद केली गेली आहे. त्यामुळे प्रदुषणाच्या बाबतीत एक नवीन विक्रम स्थापित झाला असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एमआयडीसी मधील रासायनिक कारखान्यांमधून वायू प्रदूषणाचे सत्र कायम असून, ३ मार्च रोजी रात्री वाशी, कोपरी परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदुषण झाले होते. सदर प्रदुषणामुळे परिसरात दर्प वास येत होता. तसेच नागरिकांना मळमळ, श्वास घ्ोण्यास त्रास होणे अशा घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रदूषणकारी रासायनिक कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी सुस्त बसले आहेत.

वाशी विभागात यापूर्वी ३७२ (एक्युआर) हवा गुणवत्ता निर्देशकांची नोंद झाली होती. मात्र, ३ मार्च रोजी ४०१ (एक्युआर) इतक्या निर्देशांकाची नोंद ‘सफर इंडिया' या संस्थेच्या संकेत स्थळावर झाली आहे. ४०१ (एक्युआर) हवा आरोग्यास अतिघातक आहे, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुसरीकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत पहिल्या क्रमांकाचा विक्रम स्थापित करण्याऐवजी प्रदुषणाच्या बाबतीत नवी मुंबई शहराने एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. दरम्यान, वायू प्रदूषणाबाबत अधिक माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'चे उप प्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी दिली.

नवी मुंबई शहरात मागील दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुन देखील वायू प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत आहेत. नवी मुंबई शहराचा भोपाळ होण्याची वाट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पाहत आहे का?. - बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष - पर्यावरण सेवा भावी संस्था. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे विभागात अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करतांना राजकीय दबाव