दिघा रेल्वे स्थानकाचे लवकरच लोकार्पण

रेल्वे समस्यांची सोडवणूक करण्यासाठी  रेल्वे, सिडको, आणि महापालिकेची संयुक्त समिती

नवी मुंबई ः नवी मुंबई शहरातील रेल्वे विषयक  विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक  करण्यासाठी आमदार गणेश नाईक यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांच्या समवेत रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयात उच्चस्तरीय ३ मार्च रोजी बैठक पार पडली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. सदर बैठकीला माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, ‘रेल्व'चे महाप्रबंधक गोयल, ‘सिडको'चे व्यवस्थापकीय-संचालक डॉ. संजय मुखर्जी, रेल्वे, एमआरव्हीसी आणि सिडको
प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


वाशी ते ठाणे ट्रान्स-हार्बर मार्गावर दिघा स्थानकाची निर्मिती करण्यात आली. या स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून या स्थानकाचे लोकार्पण करावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली. त्यावर रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. दिघा स्थानकामधील पार्किंगची गैरसोय पाहता पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाला पत्र दिलेले आहे. त्याचबरोबर  विशेष निधीमधून दीड
कोटी रुपयांचा निधी दिघा स्थानकासमोर स्कायवॉक बांधण्यासाठी वापरला जाणार आहे, असे नाईक म्हणाले.


नवी मुंबई शहरात ‘सिडको'ने रेल्वे स्थानकांची उभारणी करुन त्याठिकाणीचे वाणिज्य वापराचे अधिकार ‘सिडको'कडे ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकाकडे खैरणे-बोनकोडे रेल्वे स्थानक उभारण्याची जबाबदारी देऊन वाणिज्य वापराचे अधिकार महापालिकेला दिल्यास निश्चित महापालिका खैरणे रेल्वे स्थानक उत्कृष्टरित्या उभारुन लवकरात लवकर काम पूर्ण होऊ शकेल. या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाला निर्देश देण्याचे विनंती रेल्वे राज्यमंत्र्यांना नाईक यांनी यावेळी केली.


खैरणे-बोनकोडे रेल्वे स्थानकासाठी फिजिबिलिटी सर्वे...
 नवी मुंबईत दिघा आणि खैरणे-बोनकोडे या दोन नवीन रेल्वे स्थानकांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी दिघा रेल्वे स्टेशनचे काम पूर्णत्वास आले आहे. परंतु, खैरणे रेल्वे स्टेशनचे काम अद्याप सुरु झालेले नाही. रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता खैरणे-बोनकोडे रेल्वे स्टेशनचे काम देखील तातडीने हाती घेण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर खैरणे रेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी व्यवहार्यता रिपोर्ट म्हणजेच फिजिबिलिटी सर्वे करण्याचे आदेश ना. दानवे यांनी ‘रेल्वे'च्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे खैरणे-बोनकोडे स्थानक निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


दिघा येथील धरण महापालिकेकडे हस्तांतरीत करावे...
नवी मुंबईतील दिघा इलठणपाडा परिसरात सुमारे १५० वर्षापूर्वीचे ब्रिटीशकालीन धरण असून जवळपास १५ एकर जागेत धरण आहे. सद्यस्थितीत या धरणातील पाण्याचा वापर होत नसल्याने ते पडीक अणि धोकादायक बनले असून त्यामधून गळती देखील सुरु आहे. दिघा धरण नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत केल्यास अतिरिक्त पाण्याचा एक स्त्रोत महापालिकेकडे तयार होईल आणि या धरणातील पाणी देखील वापरता येईल. तसेच धरणाची डागडुजी केल्यास एक पर्यटन स्थळ विकसित करता येईल. दिघा येथील इलठणपाडा येथील मोगली धरण नवी मुंबई महापालिकेकडे र्दिघकालिन भाडेपट्ट्यावर हस्तांतरीत करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचे आश्वासन दिले.


रेल्वे, सिडको आणि महापालिकेची समिती...
नवी मुंबई रेल्वे स्थानकांमधील समस्या सोडवित असताना रेल्वे आणि सिडको प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलताना दिसतात. यामुळे समस्या जैसे थे राहते. याकडे आमदार नाईक यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचे लक्ष वेधून उचित कार्यवाही करण्याची मागणी केली. यावर रेल्वे, सिडको आणि महापालिका यांची लवकरच संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीच्या नियमित बैठका होऊन त्यामधून रेल्वे विषयक समस्यांची समन्वयाने सोडवणूक करण्यात येणार आहे.


 सदर बैठकीत नवी मुंबई शहरातील ऐरोली ते बेलापूर रेल्वे स्थानकांवर आणि परिसरात असलेली अस्वच्छता, विजेचे बंद असलेले दिवे, पंखे, रेल्वे स्थानकांवर पावसामुळे होणारे लिकेज, खिडक्यांच्या तुटलेल्या काचा, प्रवाशांना बसण्यासाठी बेंचचा अभाव, कचराकुंड्या, शौचालयातील अस्वच्छता, अद्यावत (इंग्रजी) शौचालयांचा अभाव, रेल्वे स्टेशन परिसरातील अवैध पार्किंग, नादुरुस्त रस्ते, भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे त्या मार्गाचा वापर होत नाही. भुयारी मार्गातील बंद दिवे, स्टेशनच्या इमारतीचे खांब नादुरुस्त अवस्थेत असून, स्टेशनच्या इमारतीची रंगरंगोटी करणे अशा विविध समस्या आहेत. या समस्या ‘सिडको'च्या नियंत्रणाखाली येत असून त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी ‘सिडको'ची आहे. त्यामुळे सदर समस्यांची तातडीने सोडवणूक करण्याकरिता तात्काळ कार्यवाहीचे आदेश देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई शहरात मागील दोन महिन्यांपासून प्रदूषणाच्या पातळीत दिवसेंदवस वाढ