२४ पोलीस निरीक्षकांची पोलीस आयुक्तांकडून उचलबांगडी

नवी मुंबई पोलीस दलात खांदेपालट

नवी मुंबई ः तीन महिन्यापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेले पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अखेर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील २४ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने आणि जनहितार्थ सदर बदल्या केल्याचे पोलीस आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले असले तरी आयुक्तालयातील अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्तांनी बदल्यांचा बडगा उगारल्याचे बोलले जात आहे.

 विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला दहा कोटीच्या रक्कमेसह पकडण्यात आले होते. मात्र, सदर प्रकरण योग्यरित्या न हाताळल्याने पोलीस आयुक्तांनी उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करुन इतर अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. त्याच सुमारास नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील इतर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे वारे देखील आयुक्तालयात घोंघावत होते. अखेर २ मार्च रोजी आयुक्तालयातील २४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.  

यामध्ये उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांची महापालिका अतिक्रमण प्रमुखपदी तर रिक्त झालेल्या उरण पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी संदीपान शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत कामत यांची आरबीआय सुरक्षा येथे तर रिक्त झालेल्या सानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी वाशी वाहतूक शाखेचे बापूराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांची वाहतूक शाखेत तर त्यांच्या जागेवर वाशी पोलीस ठाणे मधील पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांची, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची बदली विशेष शाखेत करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर त्याच पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक दिपक गुजर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांची वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर वाशीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. तसेच कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांची वाहतूक शाखेत तर त्यांच्या जागी विशेष शाखेतील अजय कांबळे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. एपीएमसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आल्याने त्यांच्या जागेवर परवाना शाखेचे पोलीस निरीक्षक तनवीर शेख यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आल्याने त्यांच्या जागी महापालिका अतिक्रमण विभागाच्या प्रमुख संजीव धुमाळ यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांची खारघर पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी, सुरक्षा शाखेतील पोलीस निरीक्षक सतिश निकम यांची परवाना शाखेत, कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांची वाशी पोलीस ठाणे येथे, पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांची उरण पोलीस ठाणे, नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक प्रमोद भोसले यांची वाहतूक शाखेत तर वाहतूक शाखेतील सुधाकर ढाणे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिघा रेल्वे स्थानकाचे लवकरच लोकार्पण