अनधिकृत व्यावसायिकांची महापालिका, पोलीस प्रशासनासोबत जवळीक

एपीएमसी परिसरात रात्रभर अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री

वाशी ः वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केट परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांनी आता रात्रभर आपले व्यवसाय सुरु ठेवल्याने एपीएमसी बाजार आवारातील घटकांना आणि मुळ व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, सदर अनधिकृत व्यावसायिकांची नवी मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनासोबत जवळीक  असल्याने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून वाशी मधील एपीएमसी मार्केटची ओळख आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केट मध्ये रोज हजारो ग्राहकांची वर्दळ असते. मात्र, महापालिका अतिक्रमण विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे गुन्हेगारांची बाजारपेठ म्हणून एपीएमसी बाजारपेठेला नवीन ओळख मिळत चालली आहे. एपीएमसी मार्केट मधील फळ आणि भाजी मार्केट गेट समोर सध्या अवैध खाद्यपदार्थ विकणाऱ्या धंदेवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. मात्र, अवैध खाद्यपदार्थ विकणाऱ्या धंदेवाल्यांनी खाद्यपदार्थ विक्रीच्या नावाखाली इतर विविध वस्तू विकण्याचा धंदा सुरु केला असल्याची चर्चा आहे. तर एपीएमसी मार्केट मध्ये व्यवसाय थाटणाऱ्यांची एपीएमसी पोलिसांशी चांगलीच जवळीक असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची कुरबुर या ठिकाणी सुरु असते. मात्र, एपीएमसी मार्केट मधील खाद्यपदार्थ विक्री व्यावसायाने येथील बाजार घटकांना त्रास होत असल्याने खाद्यपदार्थ विक्री व्यावसायिकांवर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२४ पोलीस निरीक्षकांची पोलीस आयुक्तांकडून उचलबांगडी