उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन

उद्या ठाणे मध्ये दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा

ठाणे ः ठाणे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,ठाणे यांच्या मार्फत ठाणे शहरातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्या ४ मार्च २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात इच्छुक तरुण-तरुणींनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘ठाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र'च्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे.

या मेळाव्यास राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अधिकारी-पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात ठाणे येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घ्ोणार आहेत. तसेच या मेळाव्यामध्ये उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या महारोजगार मेळाव्यामध्ये महिंद्रा इंटिग्रेटेड बिझनेस सोल्युशन, मॅजिक बस, अद्रोमेडा सेल्स अँड डिस्ट्रिब्युशन प्रा.लि., बिटीडब्ल्यू व्हिसा सर्व्हिसेस, कंपास ग्रुप, ट्रिनिटी इम्पोवेरमेन्ट, कनेटवेल इंडस्ट्रीज, डिएमसीएफएस, काँनेक्त बिझनेस सोल्युशनस, एनआयआयटी लि, स्टार प्लेसमेंट सर्व्हिसेसे, कॉपेरगेट कन्सल्टंट, लिव्ह लाँग इन्शुरन्स ब्रोकर, इंडिया फिल्लिंग प्रा.लि, श्रीराम जनरल इन्शुरन्स, स्पॉट लाईट कन्सल्टंट, रायटर सेफ गार्ड लि, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या कंपन्यांमध्ये मुलाखती होणार आहेत. यामध्ये एकूण ४९५२ विविध पदे उपलब्ध आहेत.

या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणारी विविध शासकिय महामंडळे सहभागी होणार असून, यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांची माहिती पुरविणारे स्टॉल लावण्यात येणार असून, याव्दारे विविध योजनांची माहिती देण्यासह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकिय आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचा देखील महारोजगार मेळाव्यामध्ये समावेश असणार आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण योजनांची माहिती देण्यासाठी राज्य कौशल्य विकास सोसायटी या महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहे, असे संध्या साळुंखे यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृत व्यावसायिकांची महापालिका, पोलीस प्रशासनासोबत जवळीक