कचरावेचक दिनानिमित्त त्यांच्या समस्यांवर निर्धार मेळाव्यात चर्चा

आंतरराष्ट्रीय कचरावेचक दिनी वेधले समस्यांकडे लक्ष

नवी मुंबई ः एक मार्च हा आंतरराष्ट्रीय कचरावेचक दिन म्हणून त्यानिमित्ताने जगभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. स्त्रीमुक्ती संघटना, परिसर सखी विकास संस्था व नूतन को-ऑपरेटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने या दिनानिमित्त निर्धार मेळाव्याचे आयोजन कोपरखैरणे येथे करण्यात आले होते. कचरा वेचक महिला हा समाजातील सर्वात उपेक्षित दुर्लाक्षित घटक असून आज मूलभूत सोयीसुविधा व शासकीय योजनांपासून वंचित असल्याचे प्रतिपादन करुन मुलांचे शिक्षण, आरोग्य व रेशन या गोष्टींबरोबरच कचरा व्यवस्थापन कामात त्यांना सामावून घेणे आवश्यक आहे असे यावेळी स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांनी सांगितले.

श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी याप्रसंगी रोजगार संधी या विषयावर मार्गदर्शन करताना कचरावेचक महिलांची मुले कचरा वेचण्याच्या कामात जाणार नाहीत हा निर्धार करण्याचे आवाहन केले. परिसर सखी विकास संस्थेच्या अध्यक्ष रुक्मिणी पॉल यांनी कचरावेचक महिलांच्या समस्या सांगताना कचरावेचकांना कचरा मिळत नाही, डम्पिंग ग्राऊंडवर प्रवेश मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या रोजी रोटीवर आक्रमण होत असल्याचे निदर्शनास आणले. बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या सीएसआर एक्झिक्युटिव्ह दिशीता देव यानी बिसलेरीच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक कामाचा आढावा घ्ोतला. वेणू वाघ हिने महापे या भागात कंपन्यांनी सुका कचरा देऊन सहकार्य करावे हे सांगताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. वी निड यु या संस्थेच्या अध्यक्ष लतिका यांनी कचरा वेचकांच्या मुलांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्याची सूचना मांडली. नवी मुंबईतील रबाळे, तुर्भे डम्पिंग, पनवेल, कळवा, दिघा या विविध भागातून दीडशे कचरा वेचक महिलांनी या निर्धार मेळाव्यात सहभाग घ्ोतला. सीमा किसवे हिने सूत्रसंचालन केले. संगीता साबळेने पाहुण्यांच्या परिचय करून दिला तर आशा गायकवाडने मागण्यांचे निवेदन सादर केले. मंगल दांडगे, मीनाक्षी वांगणेकर, मिलन जाधव, जयश्री वरपे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयातही मराठी भाषा गौरव दिन साजरा