स्वच्छतेबाबत नो कॉम्प्रोमाईज -राजेश नार्वेकर

महापालिका आयुक्तांची ऑन द स्पॉट स्वच्छता पाहणी

नवी मुंबई ः ‘निश्चय केला, नंबर पहिला' असे ध्येय नजरेसमोर ठेवून शहर स्वच्छतेवर अधिक काटेकोर लक्ष देण्याचे नवी मुंबई महापालिकेने निश्चित केले आहे. त्यादृष्टीने संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नेरुळ, तुर्भे आणि वाशी विभागाचा तसेच तुर्भे विभागातील एमआयडीसी क्षेत्रातील स्वच्छता कामांची प्रत्यक्ष १ मार्च रोजी सकाळी ६.३०च्या सुमारास पाहणी करीत स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट निर्देश दिले.

शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे स्वच्छता कामात अडथळा येतो. सदर बाबे लक्षात घेऊन आसपासच्या सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांना आणि वाहन मालकांना याची कल्पना देण्यात यावी. जी वाहने बऱ्याच दिवसांपासून धूळ खात रस्त्याच्या कडेला उभी आहेत त्यांना नोटीस लावून ती उचलून घेण्याची कार्यवाही करावी. शहर स्वच्छतेतील अडथळा दूर करावा, असे स्पष्ट निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी यावेळी दिले.

ज्याठिकाणी रस्ते, पदपथ, गटारे यांची कामे सुरु आहेत आणि त्याच्या खोदकामाचे ढिगारे अस्ताव्यस्त पडून आहेत, त्याठिकाणचे डेब्रीज व्यवस्थितरित्या ठेवून ग्रीन नेट लावले जाईल याकडेही लक्ष देण्यात यावे. ज्या मुख्य रस्त्यांवर यांत्रिकी वाहनांद्वारे सफाई करण्यात अडचणी जाणवतात, अशा ठिकाणी मनुष्यबळ लावून साफसफाई करण्यात यावी. कोणताही भाग दुर्लक्षतेमुळे अस्वच्छ राहिला अशा परिस्थितीत आढळल्यास कारवाई करण्यात यावी. 

सदर दौऱ्यामध्ये माथाडी कामगार शिल्प चौक तुर्भे येथील सार्वजनिक शौचालयातील स्वच्छतेची आणि आवश्यक सुविधांची पाहणी करताना यासारख्या वापर जास्त असणाऱ्या शौचालयांची सुविधा नियमित राहील याबाबत तेथील केअर टेकरने आण पर्यवेक्षकाने विशेष लक्ष द्यावे. तुर्भे नाका येथील फायझर रोडवर असलेल्या सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांची पाहणी करताना सदर परिसरातील लोकसंख्या लक्षात घेऊन तेथे सध्या तांत्रिक साधने उपलब्ध होत नसल्याने बंद अवस्थेत असलेले ई-टॉयलेटस्‌ आणि शी-टॉयलेटस्‌ येथील तांत्रिक रचना काढून सर्वसाधारण पध्दतीने सुरु राहतील, याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आयुवतांनी सूचित केले.

नवी मुंबई महापालिकेने शहर सुशोभिकरणासाठी शहरातील मुख्य चौकात उभारलेल्या आकर्षक शिल्पाकृतींच्या सभोवताली असलेल्या रेलींगवर पलेक्स होर्डींग लावल्याचे निदर्शनास आल्याने सदर होर्डींग तातडीने काढून टाकण्यात यावे. नागरिकांनीही याबाबत सतर्क राहून शहर अस्वच्छतेला कारणीभूत ठरणारे होर्डींग महापालिकेने निश्चित करुन दिलेल्या जागीच रितसर विभाग कार्यालयाची परवानगी घेऊन लावण्याचे आवाहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले.

शहराच्या स्वच्छ आणि सुंदर प्रतिमेला हानी पोहोचणार नाही याची दखल नागरिकांनी घ्यावी. झोपडपट्टी, गांवठाण भागालगतच्या मुख्य रस्त्यांवर लोक सकाळी कामाला जाताना आपला कचरा रस्त्याच्या कडेला टाकून पुढे निघून जातात, असे २ ठिकाणी निदर्शनास आल्याने अशाप्रकारची मनोभूमिका बदलण्यासाठी सदर भागांमध्ये घराघरात जनजागृती करावी. तसेच नागरिकांचा कचरा संकलीत करण्याची योग्य कार्यप्रणाली तातडीने कार्यान्वित करावी. संबंधित महापालिका विभाग कार्यालयानेही याबाबतच्या प्रतिबंधात्मक मोहिमा नियमितपणे आणि तीव्रतेने राबवाव्यात. मुख्य रस्त्यांवरील काही शिल्पांवर रहदारी जास्त असल्याने धूळ बसत असून अशा शिल्पाकृती नियमितपणे स्वच्छ करण्याची कार्यप्रणाली आखून द्यावी. तसेच शिल्पे दुरुस्त करुन घ्यावीत, असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.


याप्रसंगी आयुवतांसमवेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिवहन व्यवस्थापक तथा तुर्भे विभागाचे स्वच्छता नोडल अधिकारी योगेश कडुसकर, तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी भरत धांडे, स्वच्छता अधिकारी सुधाकर वडजे, आदि उपस्थित होते.

नवी मुंबई शहर नियमित स्वच्छ रहावे अशी बांधिलकी जपत महापालिका काम करीत असून येथील नागरिकांच्या संपूर्ण सक्रिय सहभागाशिवाय हे शक्य नाही. प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपल्या घरातील कचरा ओला, सुका आणि घरगुती घातक अशा ३ प्रकारे वेगळा करुन महापालिकेकडेही वेगवेगळा द्यावा. सर्वात  महत्वाचे म्हणजे आपल्या घरातील कचरा उघड्यावर रस्त्यात टाकून शहर अस्वच्छतेची कृती करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे. -राजेश नार्वेकर, आयुक्त - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कचरावेचक दिनानिमित्त त्यांच्या समस्यांवर निर्धार मेळाव्यात चर्चा