वेग मर्यादेच्या डिजीटल बोर्डवर झळकले अश्लिल शब्द

महापालिकेचे डिजीटल बोर्ड हॅक; पामबीच मार्गावरील प्रकार

नवी मुंबई ः पामबीच मार्गावर वेग मर्यादेचे नियम पाळण्यासाठी लावण्यात आलेल्या डिजीटल बोर्डमध्ये चक्क अश्लिल शब्द झळकल्याने या मार्गावरुन जाणारे वाहन चालक बुचकळ्यात पडले होते. सदर प्रकाराबाबत काही वाहन चालकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी महापालिकेला याबाबत माहिती दिली. परंतु, सदर डिजीटल बोर्ड महापालिकेच्या कुठल्या विभागाने बसवले होते, याची कल्पना दस्तुरखुद्द महापालिका प्रशासनाला नसल्याने अखेर महापालिकेच्या विद्युत विभागाला या डिजीटल बोर्डला होणारा विद्युत पुरवठा खंडीत करावा लागला. यानंतर सदर प्रकार थांबला.


दरम्यान, अज्ञात हॅकरने सदर डिजीटल बोर्डचे वायफाय कनेक्शन हॅक करुन खोडसाळ प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अनेक वाहन चालक पामबीच मार्गावर भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याने पामबीच मार्गावर नेहमी अपघाताच्या घटना घडत असतात. यापूर्वी पामबीच मार्गावर झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. तर काही जणांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. पामबीच मार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून देखील वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर नियमित कारवाई केली जाते.

पामबीच मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांनी आपल्या वाहनाचा वेग आवरावा यासाठी पामबीच मार्गावरील वाहनांसाठी ताशी ६० कि.मी. वेग मर्यादा निश्चित केली आहे. त्यासाठी महापालिकेने पामबीच मार्गावर ३ चौकांमध्ये ६० कि.मी. वेग मर्यादेचे डिजीटल बोर्ड लावले आहेत. याच डिजीटल बोर्डमध्ये १ मार्च रोजी दुपारी ६० वेग मर्यादा याऐवजी अश्लिल शब्द झळकू लागली. या मार्गावरील चौकात सिग्नलवर थांबल्यानंतर डिजीटल बोर्डमध्ये झळकलेली अश्लिल शब्द पाहून अनेक वाहन चालकांनी तोंडात बोटे घातली. काही वाहन चालकांनी याबाबतची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी सदरचे डिजीटल बोर्ड कोणी लावले आणि या डिजीटल बोर्डाचे नियंत्रण कोणाकडे आहे? याबाबत शोधाशोध सुरु केली. परंतु, प्रशासनाला सदर डिजीटल बोर्ड कोणी लावले ते समजू न शकल्याने अखेर या डिजीटल बोर्डाला होत असलेला विद्युत पुरवठा अखेर महापालिकेच्या विद्युत विभागाने बंद केला.


हॅकरचा शोध कोण आणि कधी घेणार?

वाहन वेग मर्यादा निश्चित करण्याबाबत वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्याकरिता बसविण्यात आलेले डिजीटल बोर्ड हॅक करणाऱ्या हॅकरचा शोध कोण घेणार आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या संदर्भात महापालिकेने पोलिसांकडे तक्रार केली नसल्यामुळे असे प्रकार वारंवार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डिजीटल बोर्ड बाबत महापालिका अनभिज्ञ...

दरम्यान, पामबीच मार्गावर बसवलेले डिजीटल बोर्ड महापालिकेच्या कुठल्या विभागाने बसवले, याचा शोध आता महापालिकेचेच अधिकारी घेत आहेत. महापालिकेच्या विद्युत विभागाकडे या संदर्भात विचारणा केली असता सदर डिजीटल बोर्ड कोणी बसवले याची त्यांना कल्पना नसल्याचे समजले. महापालिका प्रशासनाला देखील सदर बोर्ड कोणी बसवले ते रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील काही अधिकारी पण याबाबतीत अनभिज्ञ होते. तर नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडे यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सदर डिजीटल बोर्ड महापालिकेने लावले असावेत, असा त्यांचा समज असल्याचे स्पष्ट केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सहाय्यक आयुवत समाधान इंगळे यांच्याकडून जाणली समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती