उपायुक्त चाबुकस्वार यांच्यासह ६ अधिकारी-कर्मचारी महापालिकेतून सेवानिवृत्त


मनापासून झोकून देऊन काम करणे चाबुकस्वार यांचे वैशिष्ट्य - आयुक्त नार्वेकर

नवी मुंबई ः विहित वयोमानानुसार उपायुक्त पदावरुन सेवानिवृत्त होणाऱ्या दादासाहेब चाबुकस्वार यांच्यासह प्राथमिक शिक्षिका यशोदा बोडके, वरिष्ठ लिपिक प्रकाश बागडे, वाहन चालक किशोर गोतारणे, शस्त्रक्रियागृह सहाय्यक शाम बहादुर मौर्य, आया सुप्रिया शेलार अशा ६ अधिकारी, कर्मचारीवृंदाला सेवानिवृत्ती निमित्त महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

मुख्यालयातील ॲम्पीथिएटर मध्ये झालेल्या सदर विशेष कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे, डॉ. बाबासाहेब राजळे, सोमनाथ पोटरे, डॉ. श्रीराम पवार, अनंत जाधव, मुख्य लेखा-वित्त अधिकारी जितेंद्र इंगळे, एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडुसकर, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, शिरीष आरदवाड, शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादासाहेब चाबुकस्वार यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ कामापुरते काम केले नाही तर नाविन्याचा ध्यास घेऊन सतत वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला.त्यातही दुर्लक्षित घटकांवर विशेष लक्ष देत तळमळीने काम केले असा उल्लेख करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी उपायुक्त चाबुकस्वार यांच्या कारकिर्दीचा गौरव केला. कोणत्याही कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे काम केले तर त्या संस्थेचाच गौरव वाढतो आणि चाबुकस्वार यांनी तशा प्रकारचे संस्थात्मक काम केले असल्याचे आयुक्त नार्वेकर यांनी विशेषत्वाने सांगितले. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची आणि कोणतेही काम पुढाकार घेऊन हसतमुखाने पार पाडण्याची कार्यपध्दती असल्यामुळेच दादासाहेब चाबुकस्वार उत्तम काम करु शकले, असे अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सांगितले. तर शहर अभियंता संजय देसाई यांनी उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या व्यक्तीमत्वाची वैशिष्ट्ये सांगत न थकता अहोरात्र काम करण्याची क्षमता असणारा अधिकारी अशा शब्दात त्यांच्या कामाची प्रशंसा केली. कोणत्याही कामाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळेच हाती घेतलेल्या कामात यश लाभल्याचे देसाई म्हणाले.

नेहमी महापालिकेचे हित जोपासण्याचा प्रयत्न...

उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त करताना नवी मुंबई महापालिकेच्या नावलौकीकासाठी आपल्या परीने जे काही करता येईल, ते काम प्रामाणिकपणे केले. तसेच नेहमी संस्थेचे हित जपण्याचा प्रयत्न केले. महापालिकेत विविध पदांवर काम करताना देतील ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. या कामी तत्कालीन आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकारी कर्मचाऱ्यांनीही मोलाची साथ दिली, असे त्यांनी नमूद
केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वेग मर्यादेच्या डिजीटल बोर्डवर झळकले अश्लिल शब्द