नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे २५-३५ डबल डेकर विद्युत बस घेण्याचे नियोजन

 मार्च अखेर ‘एनएमएमटी'च्या ताफ्यात १० डबल डेकर बस

वाशी ः आत्तापर्यंत मुंबई शहरातील रस्त्यांवर धावणारी डबल डेकर बस आता नवी मुंबई शहरातील रस्त्यांवर देखील धावताना दिसणार आहे. मार्च-२०२३ अखेर नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) ताफ्यात पहिल्या टप्प्यातील १० विद्युत डबल डेकर बस दाखल होणार आहेत. त्यामुळे लवकरच नवी मुंबईतील प्रवाशांना डबल डेकर एनएमएमटी बसची सफर घडणार असून, या डबल डेकर एनएमएमटी बसची उत्सुकता नवी मुंबई शहरातील प्रवाशांना लागली आहे .

दिवसेंदिवस डिझेल, पेट्रोल यांचे दर वाढत असल्यामुळे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम तोट्यात आहे. शिवाय द्रव इंधनावर होणारा खर्च आणि धुरामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम पाहता केंद्र सरकारने सीएनजी आणि विद्युत वाहने चालवण्यावर अधिक भर दिला आहे. केंद्र शासनाच्या फेम-१ आणि फेम-२ योजना अंतर्गत नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात १८० बस आहेत. मुंबई शहरात सुरुवातीपासूनच डिझेलवर चालणाऱ्या डबल डेकर बेस्ट बस आहेत. आता ‘बेस्ट'च्या तापयात देखील विद्युत डबल डेकर बस दाखल झाली असून, प्रवाशांकरिता सुरु करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता मार्च-२०२३ अखेर नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) तापयात १० डबल डेकर बस दाखल होणार आहेत.

२५-३५ डबल डेकर विद्युत बस घेण्याचे नियोजन नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे असून, पहिल्या टप्यात १० विद्युत डबल डेकर बस घेण्यात येणार आहेत. १० विद्युत डबल डेकर एनएमएमटी बस मार्च-२०२३ अखेर नवी मुंबई शहरात दाखल होणार आहेत, अशी माहिती ‘एनएमएमटी'चे मुख्य वाहतूक अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्मशानभूमीच्या कामाला लवकरच सुरुवात