महापालिका क्षेत्रांतर्गत असलेल्या आठ विभागातील ३५ हजार सोडियम व्हेपरचे दिवे बदलणार

एलईडी दिवे महापालिका साठी फायदेशीर

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेने केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार शहरातील सोडियम व्हेपरचे दिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसवण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या एप्रिल पर्यंत शहरातील सर्व सोडियम व्हेपरच्या दिव्यांची जागा एलईडी दिव्यांनी घेतल्यानंतर महापालिकेच्या प्रत्येक महिन्याला तब्बल साडेसात लक्ष इतक्या युनिट वीजेची बचत होणार आहे. त्यामुळे महापालिकेची वर्षाला सुमारे नऊ कोटी रुपयांची वीज देयकामध्ये बचत होणार आहे. शिवाय यामुळे पर्यावरण सुधारण्यास देखील मदत होणार आहे.

वीज बचत आणि पर्यायाने वीज देयकामध्ये बचत होण्याच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने शहरातील जुने सोडियम व्हेपरचे दिवे बदलून त्या ठिकाणी नव्याने एलईडी दिवे लावण्याबाबत निविदा काढल्या होत्या. नवी मुंबई  महापालिका क्षेत्रांतर्गत असलेल्या आठ विभागातील तब्बल ३५ हजार सोडियम व्हेपरचे दिवे बदलण्याच्या या निविदेत पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीच्या कामाचा समावेश असून त्याला सुमारे ३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय नवी मुंबई महापालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सायन-पनवेल महामार्गावर १८०० एलईडी दिवे बसवण्यासह महामार्गावरील २९ हायमास्टची पुढील पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती करिता नवी मुंबई महापालिका विद्युत विभागाने स्वतंत्र निविदा काढली आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवी मुंबई महापालिकेला साडेआठ कोटी रुपये दिले असून सदरचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे.

तुर्भे विभागामध्ये एकूण ५९४० एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. यापूर्वी या विभागात सोडियम व्हेपरचे दिवे असताना मासिक ३ लाख १६ हजार युनिट वीज लागत होती. मात्र, आता या विभागात एलईडी दिवे बसवल्यामुळे सध्या १ लाख ९० हजार युनिट वीज लागत आहे. यावरुन तब्बल १ लाख २६ हजार युनिट विजेची बचत फक्त तुर्भे विभागामध्ये होत असल्याचे दिसून येते. याचा अर्थ जवळपास ४० टक्के विजेची बचत होत असल्यामुळे वीज बिलामध्ये देखील साधारणतः प्रति महिना बारा लाख रुपयांची बचत होत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे २५-३५ डबल डेकर विद्युत बस घेण्याचे नियोजन