आपल्या जीवनातून कला, संस्कृती वजा केली तर माणूसपणच राहणार नाही - कविवर्य अशोक बागवे

कविवर्य अशोक बागवे यांच्याकडून मराठीचा जागर

नवी मुंबई ः आपल्या जीवनातून कला, संस्कृती वजा केली तर माणूसपणच राहणार नसल्याचे ओळखून आपण मायबोली मराठीचा गोडवा जाणून घ्यायला हवा आणि आपल्या मराठी भाषेत अभिमानाने बोलले पाहिजे असे सांगत सुप्रसिध्द कवी प्रा. अशोक बागवे यांनी ‘माझ्या मराठीचा बोल, वाजे काळजात खोल, ओवीमधून पाझरे, निळ्या अमृताची ओल' कविता आपल्या अनोख्या गायन शैलीत सादर करुन मराठीचा जागर केला. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन' निमित्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘मायबोली मराठी' या व्याख्यानाप्रसंगी मराठी भाषेची थोरवी वर्णन करत मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे, असे मत बागवे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कविवर्य प्रा. अशोक बागवे यांच्यासह महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे मंचावर उपस्थित होते. महापालिकेचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनी भरगच्च भरलेल्या ॲम्पीथिएटरमध्ये प्रा. अशोक बागवे यांच्या वक्तृत्वाचा झरा भरभरुन वाहत होता.

आपण उगाचच मराठी भाषेविषयी न्यूनगंड बाळगतो. त्यामुळे आपल्याला मराठीचे ऐश्वर्य कळत नाही. म्हणूनच कोणत्याही भाषेचा द्वेष न करता आपल्या मायबोलीचा लौकीक वाढविण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत असे सांगत बागवे यांनी मराठी भाषेतील विविध शब्दांची अनेक उदाहरणे देत भाषेची गंमत उलगडवून दाखविली. भाषा नसती तर माणूस पशू झाला असता. त्यामुळे माणसाचे माणूसपण ज्या भाषेमुळे व्यक्त होते अशा मातृभाषेचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. दया, क्षमा, शांती आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे बोधवाक्य आहे असल्याचे त्यांनी उलगडवून दाखविले. कवी समाजाला दिशा देण्याचे काम करीत असतो. त्यामुळे कवितेशी आईच्या अंगाईपासून, लहानपणीच्या बडबड गीतांपासून जुळलेली नाळ आपण पुढेही कायम राखली पाहिजे, असेही ते म्हणाले.

जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतामधील कविवर्य राजा बढे यांचे ओजस्वी शब्द अंगात स्फूर्ती निर्माण करतात असे सांगत प्रा. अशोक बागवे यांनी या गीताचा इतिहासही उलगडवून दाखविला. कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन करीत जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताने मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. मराठी भाषेचा जागर करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांनी तसेच नवी मुंबईतील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा केला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका क्षेत्रांतर्गत असलेल्या आठ विभागातील ३५ हजार सोडियम व्हेपरचे दिवे बदलणार