राष्ट्रीय विज्ञान दिनी विज्ञानाबाबत विद्यार्थ्यांशी संवाद

‘विज्ञानाने जीवनात आधुनिकता आणली'

नवी मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नवी मुंबई जिल्ह्यातर्फे २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्ताने कोपरखैरणे, सेक्टर ११ मधील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ९४ मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.  

 आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात विज्ञानाने आधुनिकता आणली असून ती आधुनिकता आपला पेहराव, निवास, दळणवळण, संपर्क, आरोग्य इत्यादी सर्व अंगाने बहरलेली दिसते. विज्ञानाने काळाच्या कुपीतील असंख्य रहस्य आपल्यापुढे सूत्रबद्ध मांडली आहेत. काळाच्या गतीवर विज्ञानाने स्वार होऊन आपण त्या गतीला आपल्या मनानुसार वळवू शकतो. विज्ञान मानवाला जात, धर्म, प्रांत या पलिकडे पहायला शिकवते. मुळात विज्ञानाला जात, धर्म, प्रांत, लिंग या सारखे कोणतेही भेद मान्य नाही. विज्ञान मुळात निरपेक्ष आहे. आपण त्याचा जसा वापर करू तसे ते आपल्या भूमिकेत येते, असे सांगून विद्यार्थ्यांना विविध चमत्कारांची  प्रात्यक्षिके दाखवीत त्या मागील विज्ञान उलगडून सांगण्यात आले. विज्ञानाच्या आडून भोंदू बाबा बुवा चमत्काराचे दावे करून जनतेला फसवतात, आपण विज्ञान जाणून घेऊन अशी बुवाबाजी नष्ट करू या असा संदेश देण्यात आला. महा. अंनिसचे कार्यकर्ते अशोक निकम यांनी यावेळी  विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गवळी सर व शिक्षक उपस्थित होते..

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विवेकानंद संकुल शाळेत साहित्यिक गुणांना वाव देणारा कार्यक्रम