नवी मुंबई शहरात आजही राजरोस प्लास्टिक विक्री सुरुच

प्लास्टिक पिशवी विक्री रोखण्यात महापालिका प्रशासनाला अपयश

वाशी ः स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्लास्टिक मुक्त शहर करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महापालिका प्लास्टिक विरोधी कारवाई करुन प्लास्टिक प्रतिबंधात्मक जनजागृती करीत आलेली आहे. मात्र, प्लास्टिक प्रतिबंधात्मक जनजागृती कागदावरच राहिली असून, नवी मुंबई शहरात होळी निमित्ताने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक विक्री होत असल्याचे चित्र दिसत आहे.

पर्यावरणाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शासनाने २०१८ मध्ये थर्माकोल आणि एकल प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. या विरोधात कारवाईची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणांवर देण्यात आली आहे. नवी मुंबई शहरात महापालिका द्वारे प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात येते. दरवर्षी स्वच्छ भारत अभियान सुरु होताच महापालिका तर्फे प्लास्टिक विरोधी प्रतिबंधात्मक जनजागृती करत प्लास्टिक विरोधी कारवाईला वेग येतो. मात्र, महापालिका प्रशासनाची पाठ फिरताच पुन्हा   प्लास्टिक विक्री जोमात सुरु झाली आहे. ‘होळी'च्या मुहूर्तावर तर प्लास्टीक विक्रीचे प्रमाण अधिक वाढले आहे. होळी सण आणि पाण्याने भरलेले फुगे मारणे, असे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. मात्र, आता फुगे महाग आणि प्लास्टिक पिशवी स्वस्त झाल्याने फुग्यांची जागा प्लास्टिक पिशव्यांनी घेतलेली आहे. अल्पवयीन मुले नवी मुंबई शहरात सर्रासपणे प्लास्टिक पिशवीत पाणी भरुन त्या पिशवीचा फुग्यासारखा वापर करीत आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकाने प्लास्टिक बंदीसाठी केलेली जनजागृती कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

प्लास्टिक विरोधी कारवाईसाठी विभाग निहाय नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना पत्र काढून प्लास्टिक विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्याच्या सूचना देण्यात येतील. - डॉ. बाबासाहेब राजळे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन विभाग), - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राष्ट्रीय विज्ञान दिनी विज्ञानाबाबत विद्यार्थ्यांशी संवाद