पिण्याच्या पाण्यात अळ्या आणि जंतू

तुर्भे मध्ये नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा

वाशी ः मागील काही दिवसांपासून नवी मुंबई मधील तुर्भे स्टोअर परिसरातील नागरिकांना नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असून, पाण्यातून चक्क जंतू, किडे येत आहेत. सदर पाणी पिल्याने काही नागरिकांना जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या घटनेने तुर्भे स्टोअर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्वतःच्या मालकीचे धरण असलेली महापालिका अशी नवी मुंबई महापालिकेची ख्याती आहे. मात्र, याच नवी मुंबई शहरात राहत असलेल्या नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. तुर्भे स्टोअर परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असताना आता चक्क नळातून किडे आणि जंतू बाहेर पडू लागले आहेत. तुर्भे मध्ये पाणी पिण्याच्या जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या तसेच गटाराचे योग्य नियोजन नाही. तर काही ठिकाणी उघड्या गटारालगत असलेल्या जलवाहिनीला गळती असल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सदर दूषित पाणी पिल्याने नागरिकांना जुलाबाचा त्रास होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका पाणी पुरवठा विभागामार्फत योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी तुर्भे स्टोअर परिसरातील नागरिक करीत आहेत.

तुर्भे स्टोअर परिसरात येणाऱ्या गढूळ पाण्याच्या पार्श्भूमीवर पाण्याच्या टाकीचा उपसा करण्यात येत आहे. तर तुर्भे स्टोअर भागात काही जलवाहिन्या गटार आणि ड्रेनेज लाईन जवळ असल्याने त्या फुटून गढूळ पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुर्भे स्टोअर भागातील सर्व जलवाहिन्यांची तपासणी करुन त्या बदलल्या जातील. - नितीन तारमाले, उप अभियंता (पाणी पुरवठा), तुर्भे विभाग - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

फिरत्या ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध पुस्तके वाचकांना वाचावयास मिळणार