नेरुळ, सीवुडस्‌ येथील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम प्रगती पथावर

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून शिरवणे गांव येथे सीसीटीव्ही वॉच

नवी मुंबई ः शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. त्याअनुषंगाने शिरवणे गांव प्रभाग क्र.८९ येथे २५ लाख रुपये खर्चून लावण्यात आलेल्या १८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण शिवणे गांवदेव मैदान येथे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ‘नवी मुंबई'चे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते २५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले.

याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्री डॉ. राजेश पाटील, माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, माजी नगरसेविका सौ. माधुरी सुतार, राजेश पाटील, ‘काँग्रेस'चे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष संतोष सुतार, प्रभाकर ठाकूर, सुनीता नाईक, दिपेश पाटील यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या आमदार निधीतून बेलापूर मतदारसंघातील प्रत्येक विभागात शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. शिरवणे गांव प्रभाग क्र.८९ विभागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यापूर्वी वाशी, सानपाडा, तुर्भे विभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. तर नेरुळ, सीवुडस्‌ येथील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम प्रगती पथावर आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

नवी मुंबई शहरातील शाळा-महाविद्यालये, उद्याने, तलाव, बस डेपो, रेल्वे स्टेशन परिसर, सोसायटी चौक, शासकीय कार्यालये, हॉटेल परिसर, मंडई, बाजार, चौक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. तसेच नागरिकांची वाढत्या गुन्हेगारीच्या त्रासापासून मुक्तता व्हावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तरतूद करीत असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यावेळी म्हणाल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची जोडणी स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय करणार आहे. त्यामुळे जलद गतीने शहरातील वाढत्या  गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे. नवी मुंबईतील संवेदनशील ठिकाणांवर या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून गुन्हेगार त्वरित पकडले जाण्यास सहाय्य होणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पिण्याच्या पाण्यात अळ्या आणि जंतू