‘मराठी राजभाषा दिन'निमित्त ‘मनसे'चा अभिनव उपक्रम

सोसायटी तिथे पुस्तक !

नवी मुंबई ः ‘मराठी राजभाषा दिन'चे औचित्य साधून ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'तर्फे नवी मुंबई शहरात सोसायटी तिथे पुस्तक या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवी मुंबई शहरातील १०० गृह संकुलांना नामांकित लेखकांच्या दर्जेदार मराठी पुस्तकांचा संच देण्याचा संकल्प ‘मनसे'ने केला आहे. २६ फेब्रुवारी रोजी गृह संकुलांना पुस्तके भेट देऊन या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. २७ फेब्रुवारी रोजी देखील इतर गृह संकुलांना पुस्तके भेट देण्यात आल्याचे ‘मनसे'चे प्रववते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले.

नवी मुंबई ‘मनसे'च्या सोसायटी तिथे पुस्तक या उपक्रमाची सुरुवात २६ फेब्रुवारी रोजी जुईनगर येथील स्वामी सोसायटी इथून झाली. यावेळी ‘मनसे'चे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी स्वतः उपस्थित राहून सोसायटीच्या सभासदांना मराठी पुस्तकांचा संच भेट दिला. त्याचबरोबर जुईनगर, वाशी, सीवुडस्‌, नेरुळ या विभागातील गुलमोहर सोसायटी, सप्तश्रृंगी सोसायटी, एनएल-४ असोसिएशन, गंगा जमुना सोसायटी, सिध्दी सोसायटी, निसर्ग सोसायटी, नव घरकुल सोसायटी, शिवसागर सोसायटी या ठिकाणी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मराठी पुस्तकांचे संच भेट दिले. यावेळी गृह संकुलातील मानद सदस्य, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. तसेच नवी मुंबईतील इतर गृह संकुलांना ‘मनसे'च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुस्तकांचे संच भेट दिले. या उपक्रमाचे गृह संकुलातील सभासदांकडून स्वागत करण्यात आले.

मराठी वाचन संस्कृती रुजावी आणि नव्या पिढीस वाचनाचे महत्व अधिरेखीत व्हावे यासाठी असे कौतुकास्पद उपक्रम वेळोवेळी राबिवण्यात यावेत, अशी भावना गृह संकुल सभासदांनी व्यक्त केली. ‘मनसे'ने दिलेल्या या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने आत्मकथा, प्रवास वर्णन, लहान मुलांची पुस्तकं, कादंबरी, स्पर्धा परीक्षांची पुस्तकं, पाककला यांचा समावेश आहे. आजच्या सोशल मिडीयाच्या जगात तरुणांमध्ये वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. आजच्या तरुण पिढीने वाचाल तर वाचाल या उवतीला प्राधान्य देऊन वाचन संस्कृतीचे जतन करणे गरजेचे असल्याचे  गजानन काळे म्हणाले. सोसायटी तिथे ग्रंथालय उपक्रमा मागे हाच मूळ उद्देश असून नवी मुंबई शहरात वाचन संस्कृती रुजावी तसेच तरुण आणि लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘मनसे'ने सदर उपक्रम राबवत असल्याचे काळे यांनी सांगितले.

येत्या वर्षभरात नवी मुंबई शहरातील बहुतेक गृह संकुलांना टप्प्याटप्प्याने मराठी पुस्तके भेट देणार असल्याचे गजानन काळे यांनी म्हटले आहे. ‘मनसे'च्या सदर उपक्रमाप्रसंगी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह सचिव सचिन कदम, विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, अक्षय भोसले, अभिलेश दंडवते, सुहास मिंडे, उमेश गायकवाड, सागर विचारे, अशोक भोसले तसेच ‘महिला सेना'च्या अनिथा नायडू, विद्यार्थी सेनेचे संदेश डोंगरे, सनप्रीत तुरमेकर, श्रीकांत माने, अनिकेत पाटील आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ, सीवुडस्‌ येथील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम प्रगती पथावर