भूमाफियांनी महापे एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागा बळकावून झोपड्या उभारण्याचा धंदा

 महापे एमआयडीसी मध्ये अनधिकृत झोपड्यांचे पेव ?

वाशी ः महापे एमआयडीसी परिसरात बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहे. मुंबईतील भूमाफियांनी महापे एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागा बळकावून त्यावर झोपड्या उभारल्या आहेत. या झोपड्या गरिबांच्या माथी मारल्या जात आहेत. मात्र, या प्रकाराकडे एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने दिवसेंदिवस महापे एमआयडीसी परिसरात अनधिकृत झोपड्यांचे प्रमाण वाढत चालले असल्याचा आरोप होत आहे.

औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून महापालिका आणि एमआयडीसी प्रशासन कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करते. मात्र, औद्यागिक परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा देण्यात मात्र महापालिका आणि एमआयडीसी प्रशासनाकडून आखडता हात घेतला जात असल्याने औद्योगिक वसाहतीत अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य उभे राहत चालले आहे. महापे एल अँड टी कंपनी खाली, महापे-शीळ मार्गालगत महापे ए ब्लॉकमध्ये सध्या मोकळ्या भूखंडावर स्थानिक पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने काही भूमाफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या परिसरातील दहा ते बारा एकर क्षेत्रफळाचा भूखंड गिळंकृत करण्यात आला आहे. व्होेट बँकेसाठी स्थानिक पुढाऱ्यांकडून बेकायदा झोपड्यांना अभय मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. या झोपड्या गरीब आणि कामगारांना भाडेतत्त्वावर दिल्या जात आहेत. माजी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २०१७ साली औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या झोपड्यांवर धडक कारवाई करीत झोपडपट्टी दादांची दहशत मोडीत काढून एमआयडीसी मधील अनेक भूखंड अतिक्रमणमुक्त केले होते. मात्र, त्यांच्या बदलीनंतर महापालिकेची अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्याची मोहीम थंडावल्याने भूमाफियांनी पुन्हा त्यांच्या कारवाया सुरु केल्या आहेत. याचा परिणाम म्हणून औद्योगिक वसाहतीत बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या आहेत.

महापे एमआयडीसी परिसरातील वाढत्या अनधिकृत झोपड्यांविरोधात नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, बेकायदा झोपड्यांवर कारवाई करण्यास महापालिका आणि एमआयडीसी प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे या बेकायदा झोपड्यांमध्ये कोणा अधिकाऱ्यांचे हितसंबंध जडले आहेत का?, असा संशय आता येऊ लागला आहे. - नामदेव डाऊरकर, समाजसेवक - महापे गाव.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सकल हिंदू समाज'तर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा