नवी मुंबई महापालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ न दिल्यास आंदोलनाचा इशारा

 ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका प्रशासनातील ठोक मानधनावर काम करणाऱ्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी ‘नवी मुंबई इंटक'चे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिका प्रशासनात ठोक मानधनावर काम करणाऱ्या परिचारिकांच्या वेतनात महापालिका प्रशासनाकडून नुकतीच  वेतनवाढ करण्यात आली आहे. २० हजार रुपयांवरुन थेट ३५ हजार रुपये वेतन करण्यात आले आहे. त्याबाबत महापालिका प्रशासनाचे मनापासून आभार. त्याचअनुषंगाने ठोक मानधनावर काम करणाऱ्या विविध संवर्गातील सर्वच कर्मचाऱ्यांचे वेतन सरसकटपणे ४० हजार रुपये करण्याची मागणी आम्ही महापालिका प्रशासन दरबारी सातत्याने करीत आहोत. कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत १५ दिवसांची मुदत देवून समस्या न सुटल्यास महापालिका प्रशासनाच्या विरोधात कर्मचाऱ्यांसोबत ‘इंटक'च्या वतीने आपल्याच दालनात आंदोलन करणार होतो. परंतु, आपण प्रशासनाच्या वतीने समस्या सोडवण्याचे आश्वासन देताना आंदोलन न करण्याचे लेखी पत्रान्वये सुचित केले होते.

त्यामुळे आपल्या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देताना आम्ही आंदोलन स्थगितही केले, असे रविंद्र सावंत यांनी आयुवत राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. महापालिका प्रशासनात आरोग्य विभाग, शैक्षणिक, बहुउद्देशीय आणि अन्य संवर्गात जवळपास ५०० कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांनाही प्रशासनाने परिचारिकांच्या धर्तीवर सरसकटपणे ३५ ते ४० हजार रुपये वेतन करावे. ठोक मानधनावरील एका वर्गाला एक न्याय आणि ठोक मानधनावरील इतर वर्गावर अन्याय असे धोरण अनुचित आहे. सरसकटपणे ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन ३५ ते ४० हजार रुपये करावे. कामगारांना सुविधा मिळाव्यात हीच आमची महापालिका प्रशासनाकडून अपेक्षा आहे. त्यामुळे आमच्या मागणीचा विचार करावा, अन्यथा कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल, असा इशाराही रविंद्र सावंत यांनी सदर निवेदनाद्वारे दिला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई येथे येत्या ५ मार्च रोजी राज्यव्यापी महिला उद्योजक परिषदेचे आयोजन