महापालिका राबविणार ‘नवी मुंबई संविधान साक्षर अभियान'

‘नवी मुंबई पहिली संविधान साक्षर महापालिका'चा निर्धार

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेने अत्यंत भव्यदिव्य आणि सुविधाजनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेड़कर स्मारक उभारले आहे. त्यासोबतच सदर स्मारक सतत कृतिशील राहील यादृष्टीने विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे, निश्चितच ती अत्यंत प्रशंसनीय गोष्ट आहे. ‘भारतीय संविधान'चे पालन करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. ‘संविधान'चे महत्व जाणून नवी मुंबई महापालिकेने स्वयंस्फुर्तीने त्यादृष्टीने पुढाकार घेत संविधान विषयक उपक्रम राबविण्यास सुरुवात केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव तथा राज्य निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आयुक्तांसह सर्व घटकांची प्रशंसा केली.

नवी मुंबई महापालिका समाजविकास विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधान निर्मितीच्या पंच्याहत्तरी निमित्त आयोजित ‘संविधान रोजच्या जगण्यात' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा शुभारंभ माजी मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी सेवानिवृत्त सनदी अधिकारी तथा ‘संविधान दिन संकल्पना'चे शिल्पकार इ. झेड. खोब्रागडे, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सुजाता ढोले, समाजविकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त सोमनाथ पोटरे, डॉ. श्रीराम पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, स्मारकाच्या नियंत्रक अधिकारी संध्या अंबादे, मुंबई विद्यापिठाचे राज्यशास्त्र प्रा. डॉ. मृदुल निळे, एशियन कॉमनवेल्थ लोकल गव्हर्नमेंट फोरमच्या विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक अनुया कुंवर, रिसोर्स ॲण्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंटचे संचालक भीम रासकर, संविधान अभ्यासक, प्रचारक सुरेश सावंत, आदि उपस्थित होते.

यावेळी इ. झेड. खोब्रागडे यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर संविधान दिन संकल्पना संपूर्ण राज्यात आणि देशात राबविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. नवी मुंबई महापालिेकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना साजेसे स्मारक उभे केले असून ‘संविधान'ने आपल्याला दिलेल्या दिशेने प्रामाणिकपणे वाटचाल करावी एवढीच प्रत्येक नागरिकाकडून अपेक्षा आहे. संविधान आपल्या जगण्याचा भाग असून ‘संविधान'ची तत्वे प्रत्येकाला समजतील अशा अतिशय सोप्या पध्दतीने घरोघरी नेण्यासाठी नियोजनबध्द काम करण्याची गरज असल्याचे खोब्रागडे यांनी स्पष्ट केले.

महापालिकेची कार्यशाळा आयोजनामागील भूमिका मांडताना प्रत्येक सामान्य नागरिकासमोर आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या ‘संविधान'ची माहिती पोहोचावी आणि ती त्याला समजेल अशा भाषेत सांगावी यादृष्टीने महापालिका प्रयत्न करणार असल्याचे अतिरिवत आयुवत संजय काकडे यांनी सांगितले. ‘संविधान'ने दिलेल्या आपल्या हक्काबाबत नागरिक जागरुक असतात. मात्र, मुलभूत कर्तव्य पालनाची जाणीव ठेवत नाहीत. त्याअनुषंगाने ‘नवी मुंबई पहिली संविधान साक्षर महापालिका' बनविण्यासाठी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजनबध्द प्रयत्न केले जात असल्याचे काकडे यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. मृदुल निळे यांनी रोजच्या जगण्यातील संविधान या अभिनव उपक्रमाचे ५ विषयांनुसार सादरीकरण करुन मांडणी केली. एशियन कॉमनवेल्थ लोकल गव्हर्नमेंट फोरमच्या विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक अनुया कुंवर यांनी या ५ उपक्रमांबाबत गटनिर्मितीद्वारे गटचर्चा घडवून सदर विषयानुरुप गटांमधील चर्चेचे निष्कर्ष काढण्याची कार्यवाही केली. संपूर्ण दिवसभरात विविध सत्रांमधून ‘संविधान रोजच्या जगण्यात' उपक्रम राबविण्यासाठी गटनिहाय चर्चा करण्यात आली. यामध्ये १० ते १२ व्यक्तींचे गट बनवून हर घर संविधान साक्षर, संविधान स्तंभदर्शन, संविधान परिचय प्रमाणपत्र, संविधान प्रचारक, लोकशाही उत्सव या पाच विषयांवर गटांमध्ये चर्चा घडवून आणण्यात आली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ न दिल्यास आंदोलनाचा इशारा