‘सिडको एम्प्लॉईज युनियन'तर्फे शिवजयंती साजरी

 ‘सिडको'मध्ये डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे शिव व्याख्यान संपन्न

नवी मुंबई ः ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सिडको भवन येथे रोजी शिव व्याख्याते शिवश्री डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे २३ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘सिडको'चे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी भूषविले. तर कार्यक्रमास सुप्रसिध्द नाट्य, सिने, टिव्ही अभिनेते तथा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अनाजीपंत महेश कोकाटे, ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, डॉ. व्ौÀलास शिंदे, ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'चे अध्यक्ष विनोद पाटील, सरचिटणीस जे. टी. पाटील, आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

‘सिडको एम्प्लॉईज युनियन'तर्फे साजरी करण्यात येणारी शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी साजरी व्हावी, असा ‘युनियन'चा दरवर्षी प्रयत्न असतो. आजवर शिवजयंतीच्या कार्यक्रमाला ‘युनियन'तर्फे छत्रपती शिवेन्द्रराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले, बाबासाहेब पुरंदरे, नामदेवराव जाधव, नितीन बानगुडे पाटील, संभाजी भिडे गुरुजी आणि अन्य मान्यवरांना प्रमुख अतिथी तसेच व्याख्याते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी राज्यसभा खासदार
श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि कोल्हापूरच्या शाहू महाराजांचा दैदिप्यमान वारसा लाभलेले तसेच महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रत्येक शिवप्रेमींना माहित असलेले व्यक्तिमत्व कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल कार्यक्रमाला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले, असे ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'चे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, शिवजयंतीचा सोहळा केवळ समारंभ न राहता उपस्थितांना शिवरायांच्या अलौकिक जीवनातून काही बोध घेता यावा, वैचारिक मार्गदर्शन मिळावे यावर ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'चा भर असतो. अनेक शतके उलटली तरी लाखोंना स्फुर्ती देणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र राज्यात अवतरले हेच आम्हा सर्वांचे अहोभाग्य आहे. शिवचरित्रापासून प्रेरणा घेत नितीमत्ता, धैर्य आणि कर्तव्य या मार्गावरुन आम्ही वाटचाल करीत आहोत आणि यापुढेही करत राहू, असा विश्वास शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने सरचिटणीस जे. टी. पाटील यांनी व्यक्त केला.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका राबविणार ‘नवी मुंबई संविधान साक्षर अभियान'