महापालिका मुख्यालयात कचरा फेकण्याचा इशारा

कचरा कुंडी हटविण्यासाठी नेरुळ ग्रामस्थ आक्रमक

वाशी :  नेरुळ गावातील बेकरी जवळ असलेली कचरा कुंडी हटवा, अशी मागणी नेरुळ गावातील रहिवासी वारंवार करत आले आहेत. मात्र, मागणी करुन देखील नवी मुंबई महापालिका प्रशासन मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने ३ सप्टेंबर रोजी नेरुळ गावातील रहिवाशांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई महापालिका ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर' म्हणून जनजागृती करत आहे. तसेच कचरा कुंडी मुक्त नवी मुंबई शहराचा नारा देखील महापालिका देत आली आहे. मात्र, सदर नारा फक्त दिखाव्याचा ठरत असून, वास्तवात चित्र वेगळेच आहे. नवी मुंबई शहरात आजही कचराकुंड्या हटवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे त्या ओसंडून वाहत आहेत. मात्र, सदर कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नेरुळ गावात बेकरी जवळ असलेल्या कचराकुंडीमुळे येथील रहिवाशांना नाक मुठीत धरावे लागत आहे. त्यामुळे सदर कचरा कुंडी हटवावी, अशी मागणी नेरुळ गावातील रहिवासी महापालिका प्रशासनाकडे वारंवार करत आलेले आहेत. मात्र, परिस्थिती ‘जैसे थे' असल्याने नेरुळ गावातील रहिवासी आक्रमक झाले असून, त्यांनी ३ सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.

दरम्यान, येत्या आठवडा भरात नेरुळ गावातील बेकरी जवळ असलेली कचरा कुंडी हटवली गेली नाही तर नवी मुंबई महापालिका मुख्यालयात कचरा फेकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती ‘काशीकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट'चे अध्यक्ष देवनाथ म्हात्रे यांनी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घाऊक बाजारात तांदळाच्या दरात वाढ