कळंबोलीतील ‘मार अल्वर्स दया भवन'चे उद्घाटन
संस्थेतील गोरगरीब-अनाथ मुलांसाठी संगणक देणार - आ. मंदाताई म्हात्रे
नवी मुंबई : दि मालानकरा आर्थोडॉक्स चर्च कॉन्सील ऑफ बॉम्बे संस्था गेल्या अनेक वर्षापासून समाजपयोगी तसेच गोरगरीब आणि अनाथ मुलांना आधार देण्याचे काम करीत आहे. या संस्थेच्या वतीने गोरगरीब आणि निराधार मुलांचे संगोपन, पालनपोषण आणि प्रशिक्षण देण्याकरिता कळंबोली, सेक्टर-६ई येथील ‘मार अल्वर्स दया भवन' या वास्तुची उभारणी करण्यात आली आहे. या वास्तुचे उद्घाटन ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी मार कॉरीलोस (मेट्रोपॉलिटन), वाशीतील सेंट मेरीज् हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अब्राहिम जोसेफ, थॉमस चाको, सेवानिवृत्त अतिरिवत महापालिकाआयुवत अमिरीश पटनिगीरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर, डॉली जेम्स, डॉ. दिव्या तसेच इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
मी अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. गोरगरीब महिला, नागरिकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करीत आहे. महिलांनी सक्षम होऊन जगायला हवे, गोरगरीब जनतेला सरकारी योजनांचा लाभ कसा मिळेल, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कोरोना काळात नवी मुंबई मधील अनेक गोरगरीब, होतकरु कुटुंबांना भरघोस मदत केली. बेलापूर विधानसभा मतदारसंघात चांगली विकास कामे करुन या विभागाचा चेहरा-मोहरा बदलून टाकल्याने नागरिकांचा विश्वास संपादन करता आल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. तसेच थोर सामाजिक कार्यकर्त्या कै. सिंधुताई सपकाळ यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन दि मालानकरा आर्थोडॉक्स चर्च कॉन्सील ऑफ बॉम्बे संस्था अनेक वर्षापासून समाजोपयोगी तसेच गोरगरीब, निराधार मुलांना आधार देण्याचे काम करीत आहेत. संस्थेच्या ‘मार अल्वर्स दया भवन'मध्ये गोरगरीब आणि निराधार मुलांच्या संगोपना बरोबरच त्यांना विविध रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहेत, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.
दरम्यान, समाजातील गोरगरीब आणि निराधार मुलांना आजच्या डिजीटल दुनियेत जगता यावे आणि संगणकीय शिक्षण घेता यावे म्हणून दि मालानकरा आर्थोडॉक्स चर्च कॉन्सील ऑफ बॉम्बे या संस्थेला माझ्या आमदार निधीमधून संगणक देण्याची घोषणाही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी केली.