शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
तुर्भे मधील पदपथांची दुरवस्था; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
काही पदपथांवर दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज
तुर्भे : तुर्भे सेक्टर-२०, २१, २४, १९, तुर्भे गाव या परिसरांमध्ये पुष्कळ प्रमाणात पदपथांची दुरवस्था झाल्याने पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पदपथांच्या दुरुस्तीकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. तसेच स्थानिक रहिवासी असोसिएशन देखील दुरवस्था झालेल्या पदपथांकडे लक्ष देत नसल्याने पादचाऱ्यांना चालताना विविध प्रकारची अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
तुर्भे विभागामध्ये गावठाण भाग म्हणून तुर्भे गावाचा समावेश आहे. तसेच सिडको क्षेत्रातील भाग म्हणून तुर्भे सेक्टर-१९ ते सेक्टर-२४ या रहिवाशी क्षेत्राचा समावेश आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम नवी मुंबई महापालिका मार्फत केले जाते. महापालिका शहर अभियंता विभागाच्या मार्फत रस्ते, गटार, उद्यान, सुविधा इमारत, मलवाहिन्या आदी पायाभूत सुविधा तुर्भे विभागामध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र, तुर्भे परिसरातील पदपथांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामध्ये आय.सी.एल. शाळेच्या प्रवेशद्वारापासून तुर्भे गाव शौचालय, साईबाबा मंदिर ते योगी उपाहारगृह, गावठाण लगतचा सर्व्हिस मार्गाचा पदपथ, तुर्भे सेक्टर-२४, सेक्टर-२१ येथील आदर्श मैदानाकडे जाणारा रस्ता, सेक्टर-२० येथील महापालिका उद्यानापासून रेल्वे स्थानकापर्यंत जाणारा रस्ता, एपीएमसी फळ मार्केट पासून सीडब्ल्यूडी गोडाऊनकडे जाणाऱ्या मार्गावरील पदपथ, स्मशानभूमी ते अरेंज चौकापर्यंतचे काही पदपथ चक्क गायब झाले आहेत. काही ठिकाणी दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज खोलण्यात आलेले आहेत. याकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. तसेच अनेक ठिकाणी पदपथावरती दुचाकी आणि चार चाकी पार्किंग केल्या जात आहेत. त्यामुळे पदपथ खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी पदपथावरती बांधकाम साहित्य आणि डेब्रिज टाकण्यात आले आहे. याबाबत, महापालिका शहर अभियंता विभागाकडे विचारणा केली, तर ते महापालिका तुर्भे विभाग कार्यालयाकडे बोट दाखवतात. महापालिका अतिक्रमण विभागाच्या हलगर्जीपणामुळे तुर्भे परिसरात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांचे बांधकाम साहित्य बिनधास्तपणे रस्ते आणि पदपथ यांवर टाकले जात असल्याने तुर्भे विभागातील पदपथांच्या दुरावस्थेत वाढ होत आहे.