मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये यकृत प्रत्यारोपण यशस्वी

लिव्हर दान करत भावाला रक्षाबंधनाची अनोखी भेट
 

नवी मुंबई : भाऊ आणि बहिणीचे नाते पवित्र आणि अतूट असते. अशाच एका २१ वर्षीय बहिणीने ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस या आजाराशी लढा देत असलेल्या आपल्या १७ वर्षीय भावासाठी यकृत दान करुन रक्षाबंधनची अनोखी भेट दिली. खारघर मधील मेडिकवर हॉस्पिटल्सचे यकृत प्रत्यारोपण-एचपीबी शस्त्रक्रिया संचालक डॉ. विक्रम राऊत यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने सदरची यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली.

पुणे पिंपरी-चिंचवड जवळ असणाऱ्या जुनी सांगवी गावातील राहुल संतोष पाटील दहावीला शिकत आहे.  त्यापैकी नंदिनी ही त्यांची मोठी मुलगी जी सध्या महाविद्यालयात शिकत आहे तर, राहुल हा त्यांचा धाकटा मुलगा आहे जो आता दहावीला आहे. राहुलला अचानक अशक्तपणा जाणवू लागला आणि रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या, तेव्हा त्यांचे संपूर्ण कुटुंब घाबरले. त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे धाव घेतली; पण त्याने फारसा फरक पडला नाही.  अखेर पाटील यांनी सहकाऱ्यांच्या सुचनेनुसार राहुलला मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये पुढील उपचाराकरिता दाखल केले. तेव्हा राहुलला ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस झाला असून त्याला यकृत प्रत्यारोपणाची नितांत गरज निर्माण झाली.

ऑटोइम्यून यकृत रोगात, रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या स्वतःच्या यकृत पेशींच्या विरुध्द कार्य करण्यास सुरुवात करते. जर लवकर निदान झाले तर औषधांनी उपचार केले जाऊ शकतात. परंतु, राहुलच्या बाबतीत उशीरा निदान झाले आणि त्याला वारंवार रक्तस्त्राव, जलोदर (ओटीपोटात द्रव जमा होणे) आणि कावीळ यासारख्या गुंतागुंत होत्या. त्यामुळे राहुलला यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. त्याची आई HbsAg पॉझिटिव्ह आढळल्याने तिला दाता म्हणून नाकारण्यात आले. अखेर राहुलची २१ वर्षीय बहीण नंदिनी पाटील लिव्हर दानाकरिता पुढे सरसावली.

राहुलच्या बहिणीने आजारी त्याचा जीव वाचवण्यासाठी कसलाही विचार न करता स्वतःचे यकृत दान केले. अन्यथा वेळीच उपचार न मिळाल्यामुळे राहुलला जीव गमवावा लागला असता. वडील कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. पाटील कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हते. मात्र, त्यासाठी प्रत्यारोपण न थांबविता मेडिकवर हॉस्पिटल आणि इतर सेवाभावी संस्थांनी मदत केली. २६ जून २०२३ रोजी यकृत प्रत्योरापणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. आता दाता आणि रुग्ण या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे प्रत्येकाने अवयव दान करावे. निरोगी व्यक्ती कोणत्याही नकारात्मक परिणामांशिवाय त्यांचे यकृत सुरक्षितपणे दान करु शकते, असे आवाहन असेही डॉ. विक्रम राऊत यांनी केले आहे.

 माझा भाऊ हाच माझ्यासाठी संपूर्ण जग आहे. रक्षाबंधनाला मी त्याला एक मौल्यवान भेट दिली, याचा मला खूप अभिमान वाटतो आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही त्याच्या प्रकृतीबद्दल अत्यंत चिंतेत होतो. आता माझ्या भावाला नवे आयुष्य मिळाले आहे. - नंदिनी पाटील, रुग्ण राहुलची बहीण.

बहिणीने मला रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली आहे. माझी बहीणच माझा कणा आहे आणि तिने केलेल्या अमुल्य दानाबाबत मी आयुष्यभर ऋणी राहीन. तिच्यामुळेच आज मला नवे आयुष्य मिळाले आहे. - राहुल पाटील, रुग्ण.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहतूक कोंडीत भर