ना. अब्दुल सत्तार यांची ‘एपीएमसी'ला भेट
‘बाजार समिती' आवाराच्या पुनर्विकासाचा निर्णय लवकरच -पणन मंत्री
नवी मुंबई : मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या बरोबरच व्यापारी, माथाडी यांच्यासाठीही महत्त्वाची संस्था आहे. या सर्व घटकांना विचारात घेऊन लवकरच ‘बाजार समिती' आवाराच्या पुनर्विकासासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे पणन, अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
दरम्यान, एपीएमसी आवारातील बहुतांश इमारती धोकादायक बनल्या असून त्यांच्या पुनर्विकासाची गरज निर्माण झाली आहे. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे पुनर्विकासाच्या कामाला गती मिळत नाही. त्यामुळे येत्या १०० दिवसात ‘एपीएमसी'मधील इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्याचे संकेत ना. सत्तार यांनी यावेळी दिले.
पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी २३ ऑगस्ट रोजी वाशी येथील ‘मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती'ला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘बाजार समिती'च्या सदस्यांबरोबरच विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ‘एपीएमसी'चे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, सदस्य आमदार शशिकांत शिंदे, सचिव भुसारे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ना. अब्दुल सत्तार यांनी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विविध समस्या व अडचणींची माहिती घेतली. तसेच पुनर्विकास प्रकल्पाचीही यावेळी माहिती घेतली.कृषि उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन निर्माण केली आहे. त्यामुळे त्यास प्राधान्य देण्यात यावे. नियमन मुक्तीमुळे बाजार समितीच्या उत्पन्नात घट झालेली असली तरी उत्पन्न वाढविण्यासाठी ‘एपीएमसी'ने उपाययोजना सुचवाव्यात. तसेच ‘बाजार समिती'ची कार्यकक्षा वाढविण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल. ‘बाजार समिती'च्या आवारातील गाळे अतिधोकादायक झाले आहेत. त्याचा पुनर्विकास करण्याची आवश्यक आहे. त्यासाठी बाजार समिती सदस्य, व्यापारी, माथाडी कामगार यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन पुनर्विकासासंदर्भात तसेच इतर विषयांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शासनस्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल, असे ना. अब्दुल सत्तार म्हणाले. ‘बाजार समिती'मध्ये मूलभूत पायाभूत सुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. तसेच ‘बाजार समिती'ने आपल्या कामकाजात संगणकीय प्रणालीचा वापर वाढवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सभापती डक आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांनीही यावेळी विविध अडचणी मांडल्या. ना. अब्दुल सत्तार यांनी यावेळी ‘बाजार समिती'च्या आवारातील गाळ्यांची पाहणी केली.