दक्षिण नवी मुंबईतील सिडकोच्या भूखंडांना वाढती मागणी  

30 भूखंड विक्रीतून सिडकोला 1400 कोटींचे उत्पन्न  

नवी मुंबई : 30 भूखंड विक्रीच्या माध्यमातून गुरुवारी सिडकोच्या तिजोरीत तब्बल 1400 कोटी रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे उत्तर नवी मुंबई पाठोपाठ आता सिडकोच्या दक्षिण नवी मुंबईतील भूखंडांना देखील विकासकांकडून चांगलीच पसंती मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी सिडकोने खारघर, पनवेल, कामोठे, कळंबोली व द्रोणागिरी येथील 30 भूखंड निविदेद्वारे विक्रीस काढले होते.  

खारघर सेक्टर-11 येथील  भूखंडाला 3 लाख 77 हजार रुपये प्रति चौरस मीटरचा दर प्राफ्त झाला असून दक्षिण नवी मुंबईतील भूखंडाला मिळालेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर असल्याची माहिती सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी दिली. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी सिडकोने उत्तर नवी मुंबईतील 13 भूखंड विक्रीस काढले होते. त्यावेळी नेरुळ येथील भूखंडाला सिडकोच्या 52 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वाधिक 6 लाख 72 हजार 651 रुपये प्रति चौरस मीटर विक्रमी दर  प्राप्त झाला होता.
सिडकोच्या मार्केटिंग विभागाने काही दिवसांपूर्वी भूखंड विक्री योजना-35द्वारे खारघर, पनवेल (पूर्व व पश्चिम), कामोठे, कळंबोली, द्रोणागिरी येथील विविध आकारमानाचे 38 भूखंड निविदेद्वारे विक्रीस काढले होते. सिडकोच्या या भूखंड विक्री योजनेस विकासकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. खारघर सेक्टर-11 येथील भूखंड क्रमांक 103 या 3646 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडास सर्वाधिक बोली 3 लाख 76 हजार 399 रुपये इतकी प्राफ्त झाली असून सदर बोली ही विहान इफ्रा या विकासकाद्वारे लावण्यात आली आहे. याशिवाय खारघर सेक्टर-11 येथील अन्य 3 भूखंडांना देखील 3 लाखांच्या वरती प्रति चौरस मीटर दर प्राप्त झाला आहे.  

यापूर्वी खारघर येथील भूखंड विक्रीचा प्रति चौरस मीटर  दर सव्वा ते दीड लाख रुपये सिडकोला प्राप्त होत होता. त्यामध्ये आता 70 टक्के ते 350 टक्क्यापर्यंत  वृध्दी झाल्याचे दिसून आले. नवी मुंबई विमानतळाचे काम जस जसे प्रगतीपथावर जाईल तस तसे सिडकोच्या दक्षिण नवी मुंबईतील भूखंडांची मागणी वाढत जाणार असून येथील भूखंडांना उत्तर नवी मुंबई प्रमाणेच विक्रमी दर प्राप्त होतील असा विश्वास सिडको अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, द्रोणागिरी येथील 4 भूखंडांना विकासकांनी प्रतिसाद दिला नसल्याने सिडकोचे अधिकारी चकीत झाले आहेत. या भूखंड विक्रीसाठी सिडकोने ठरविलेला किमान दर (बेस रेट) हा मार्केट दरापेक्षा जास्त असून द्रोणागिरी परिसरात विकासकांना साडेबारा टक्क्याचे भूखंड कमी दरात मिळत असल्याचे बोलले जात आहे.  

त्याचबरोबर या भूखंड विक्री योजनेतील पनवेल व कळंबोली येथील 3 भूखंडांना विकासकांनी प्रतिसाद दिलेला नाही. तर खारघर येथील 40 चौरस मीटर भूखंडाच्या निविदेत सर्वाधिक बोली लावणाऱ्या विकासकाने प्रति चौरस मीटर दराच्या रकान्यात संपुर्ण भूखंडाची किंमत 32 लाख 33 हजार नमूद केल्याने या छोटÎाशा भूखंडाची किंमत थेट 13 कोटीच्या घरात गेली आहे. त्यामुळे सदर निविदा बाद होण्याच्या मार्गावर आहे.

दरम्यान, या भूखंडविक्री योजनेतील काही भूखंड वर्षभरापूर्वी सिडकोने विक्रीस काढले होते. वर्षभरापूर्वी या भूखंडांना प्राफ्त झालेले दर हे सिडकोला अपेक्षित असलेल्या दरापेक्षा कमी प्राप्त झाल्याने सिडकोने सदर भूखंडांची विक्री त्यावेळी रद्द केली होती. त्यानंतर वर्षभराने सिडकोने ते भूखंड विक्रीस काढल्यामुळे सिडकोचे होणारे आर्थिक नुकसान टळले असून सिडकोला आता समाधानकारक दर प्राप्त झाल्याचे  सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी सांगितले.  

नवी मुंबई शहराची उभारणी करताना सिडकोने निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा व रेल्वे-विमानतळ-मेट्रो सारख्या दळणवळणाच्या प्रकल्पांमुळे नवी मुंबईकडे नागरिक आकर्षित होत आहेत. त्यामुळेच सिडको भूखंडांना देखील तेवढीच मागणी वाढत असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांचे म्हणणे आहे. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

९ ऑगस्ट रोजी हजारो भूमीपुत्रांच्या उपस्थितीत नामफलकाचे अनावरण