शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
कार्यादेशाचा कालावधी संपत आला, कामाला सुरुवात कधी?
तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलाच्या कामाला विलंब
वाशी : ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे रेल्वे स्थानकासमोर वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या वतीने उड्डाणपुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, सदर कामाच्या कार्यादेशाची मुदत संपायला आली तरी देखील या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर कामास दिरंगाई होत असल्याने तुर्भेवासियांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वे स्थानक असून पूर्वेला मोठी झोपडपट्टी तसेच एमआयडीसी परिसर आहे. तर तुर्भे स्थानकाच्या पश्चिम बाजुला एपीएमसी बाजार समिती आहे. त्यामुळे रोज हजारो नागरिकांना सदर रस्ता ओलांडावा लागतो. मात्र, सदर रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी तसेच उड्डाणपूल नसल्याने या ठिकाणी आजवर अनेक अपघात होऊन १५ पेक्षा नागरिकांना आपला जीव गमावावा लागला असून अनेक नागरिक जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तुर्भे स्टोअर परिसरात उड्डाणपुल बांधण्यात यावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून वारंवार करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुल बांधण्याचा निर्णय घेतला असून, २०१८ साली महासभामध्ये सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
या कामासाठी सुमारे ३० कोटी ५० लाखांचा खर्च होणार आहे. त्यानुसार या कामाचे कार्यादेश मे. महावीर इन्फ्रा या कंपनीस २६ एप्रिल २०२२ रोजी देण्यात आले असून काम पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. पण, या कामाची मुदत येत्या २५ ऑक्टोबर २०२३ रोजी संपत आहे. सदरची मुदत संपण्यास अवघे तीन महिने शिल्लक राहिलेले आहेत. तरी देखील उड्डाणपुलाच्या कामाला अजुनही सुरुवात करण्यात आली नाही. सदर कामास दिरंगाई होत असल्याने तुर्भेवासियांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुल व्हावे म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. यानंतर महापालिकेने उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. मात्र, या कामात वाहतूक विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने उड्डाणपुल उभारण्याच्या कामाला दिरंगाई होत असल्याचे आम्हाला कळविण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत मी स्वतः वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांची भेट घेणार आहे. - सुरेश कुलकर्णी, माजी सभापती - स्थायी समिती, नवी मुंबई महापालिका.
पाठीमागच्या काळात मुंब्रा बायपास रस्ता कामासाठी बंद ठेवल्याने याठिकाणची वाहतूक ठाणे-बेलापूर मार्गावर वळविण्यात आली होती. मात्र, आता ते काम झाले असून तुर्भे उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूक वळवावी लागणार आहे. त्यासाठी वाहतूक विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असून लवकरच ते प्राप्त झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होईल. - संजय देसाई, शहर अभियंता - नवी मुंबई महापालिका.