‘सिडको'चे २८ कोटी रुपये खड्ड्यात

तळोजा येथील रस्त्याची २ महिन्यातच चाळण

नवीन पनवेल : तळोजा फेज-१ आणि फेज-२ विभागामध्ये २८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. पहिल्या पावसातच सदर रस्ता वाहून गेला आहे. या रस्त्याच्या कामात मोठा भष्ट्राचार झाला असून सिडको अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने शासनाच्या पैशावर डल्ला मारला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी होवून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावे आणि संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी ‘पाचनंद नगर रहिवाशी सामाजिक संस्था'च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष कासम मुलानी यानी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तळोजा फेज-१ आणि फेज-२ रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्यावरुन चालताना नागरिकांना मोठा त्रास होत होता. नागरिकांना पाठ आणि कंबर दुःखी सारख्या आजाराना समोर जावे लागत होते, वाहनांचे नुकसान होत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये ‘सिडको' विरोधात तीव्र नाराजी होती. सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी म्हणून ‘सिडको'कडे अनेक वेळा पाठपुरावा, प्रत्यक्ष अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यात आल्या. या अथक पाठपुराव्यानंतर ‘सिडको'ने सदर रस्ता २८ कोटी रुपये खर्च करुन बनविला होता. सदर रस्त्याचे काम पी. पी. खारपाटील याना देण्यात आला होता. त्यावेळी काम चालू असताना डांबरीकरण करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे ‘सिडको'च्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु, ‘सिडको'च्या अधिकाऱ्यांनी सदर बाब गांभीर्याने घेतली नाही. परिणामी, दोनच महिन्यामध्ये ‘सिडको'चे २८ कोटी  रुपये खड्ड्यात गेल्याचे उघड झाले आहे, असे कासम मुलानी म्हणाले.

२ महिन्यांपूर्वी २८ कोटी रुपये खर्च करुन बनवलेल्या रस्त्याची चाळण झाली असून यात मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. तळोजा फेज-१ आणि २ या रस्त्याच्या डांबरीकरण कामाची सखोल चौकशी करुन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकुन या कामातील संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कडक कारवाई करावी, यासाठी ‘सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालकांकडे मागणी केली आहे. अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागणार. -कासम मुलानी, अध्यक्ष-पाचनंद नगर रहिवाशी सामाजिक संस्था.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली 40 युवकांना नोकरी पत्राचे वाटप