मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन

ऑगस्ट मध्ये नवीन इमारतीतून ‘आरटीओ'चे कामकाज

वाशी : नेरुळ मधील आरटीओ कार्यालयाच्या नवीन इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन नवीन कार्यालयाची प्रतीक्षा संपली आहे. येत्या ऑगस्टमध्ये नवीन आरटीओ इमारतीतून कामकाज सुरु करण्यात येणार आहे.

नेरुळ येथील नवी मुंबई, वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम जानेवारी- फेब्रुवारी दरम्यान पूर्ण झाले होते. परंतु, या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने आरटीओ कार्यालयाचे स्थलांतर रखडले होते. आता भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याने   येत्या ऑगस्ट मध्येच आरटीओ नवीन कार्यालयातून  कामकाज सुरु होणार आहे. नवी मुंबई शहराकरिता सन २००४ मध्ये नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यात आले आहे. मात्र, तेव्हा पासून आरटीओ कार्यालय वाशी मधील एपीएमसी बाजारात भाडेतत्त्वावर सुरु आहे. आरटीओ कार्यालयाला आता स्वतःची इमारत उपलब्ध होणार आहे. नेरुळ येथे नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत बांधून तयार असून, आता या इमारतील ओसी देखील मिळाली आहे. त्यामुळे  लवकरच या इमारतीतून कारभार चालणार आहे.


नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला स्वतःची जागा असावी म्हणून, ‘सिडको'कडून नेरुळ सेक्टर-१३ मध्ये भूखंड घेण्यात आला. मात्र, सदर भूखंड ताब्यात घेण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विलंब झाला होता. अखेर सन २०१९ मध्ये या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. परंतु, त्यांनतर कोरोना आणि टाळेबंदीने या इमारतीचे  बांधकाम संथ गतीने झाले. आता नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत पूर्ण तयार झाली असून, ‘आरटीओ कार्यालय'चे कामकाज आता नव्या इमारतीतून सुरु होणार आहे.

नवीन नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची प्रतीक्षा संपली असून, येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुधारीत वेळ घेऊन त्यांच्या हस्ते नवीन आरटीओ कार्यालयाचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन आखले आहे. त्यामुळे येत्या ऑगस्ट मध्ये नवीन इमारतीतून ‘आरटीओ'चे कामकाज चालणार आहे. - हेमांगिनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी.

नवीन आरटीओ इमारतीत रस्ता सुरक्षा आणि हिरकणी कक्ष
सध्या नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालय वाशी मध्ये छोट्या जागेत सुरु आहे. मात्र, आता नेरुळ येथील आरटीओ कार्यालयाची नवीन इमारत सुसज्ज अशी ४ मजली आहे. या इमारतीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. या नवीन आरटीओ कार्यालयात स्वतंत्र रस्ता सुरक्षा कक्ष आणि महिला कर्मचाऱ्यांकरिता हिरकणी कक्ष सुरु करण्यात येणार आहे. वाहतुक परवानासाठी हॉल सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सर्व अधिकाऱ्यांसाठी वेगळी केबिन उपलब्ध असणार आहे. नागरिकांसाठी बसण्याची, पाण्याची सुविधा असणार आहे. ‘रस्ता सुरक्षा'चे महत्व पटवून देण्यासाठी नवीन आरटीओ इमारतीत ‘एलईडी टिव्ही'च्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एमआयडीसी प्रकल्पग्रस्त ६२ वर्ष पुनर्वसनापासून वंचित!