दिनांक 17 जुलै ते 24 जुलै पर्यत 762.84 मि.मी पावसाची नोंद

पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे तातडीने हाती घ्यावी : अभिजीत बांगर*

ठाणे  : दिनांक 17/7/2023 ते 24/7/2023 सायंकाळी 5.30 वाजेपर्यत 762.84 एवढया मि.मी पावसाची नोंद ठाणे शहरात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जी रस्त्याची कामे खराब झाली आहेत, त्या रस्त्यांची दुरूस्ती तातडीने हाती घेण्यात यावी. ज्या ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत, त्या ठिकाणी मास्टिक पद्धतीने दुरूस्ती करण्यात कोणतीही दिरंगाई न करता बारा तासाच्या आत रस्ते दुरूस्त होतील या दृष्टीने कामे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले.

मागील काही दिवस संततधार पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचत होते. यामुळे काही ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत. सदर रस्त्यांची पावसाची उघडीप मिळताच रस्ते दुरूस्ती करावी. यासाठी रस्ते भरण्यासाठी मास्टीक जलदगतीने उपलब्ध करुन घेण्याच्या सूचना नगर अभियंता व उपनगर अभियंता यांना बैठकीत देण्यात आल्या. मास्टिकच्या साहाय्याने केलेली रस्ते दुरूस्ती ही पावसात देखील टिकून राहत असल्यामुळे मास्टिकचाच वापर करण्यात यावा, यासाठी मास्टिकचे लोड मोठ्याप्रमाणावर उपलब्ध करुन घ्यावेत. प्रभाग समिती निहाय सर्व कार्यकारी अभियंत्यांना मास्टिक उपलब्ध होईल या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्तांनी दिल्या.

प्रभागसमितीनिहाय रस्ते दुरूस्तीचा अहवाल प्राप्त व्हावा यासाठी एका कनिष्ठ अभियंत्यांची नेमणूक करा, जेणेकरुन मास्टिक उपलब्ध करण्यास सोईचे होईल. मास्टिकचे लोड दैनंदिन  उपलब्ध होतील या दृष्टीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. विवियाना मॉलसमोरील उड्डाणपूल, माजिवडा उड्डाणपूल या ठिकाणची रस्ते दुरूस्ती प्राधान्याने करण्याच्या सूचनाही आयुक्त  बांगर यांनी दिल्या. तसेच प्रभाग समिती निहाय असलेल्या कार्यकारी अभियंत्यांनी कंत्राटदाराच्या माध्यमातून मास्टिक उपलब्ध होईल यासाठी पाठपुरावा करावा. तसेच याबाबत एकमेकांसोबत समन्वय ठेवून कामे करावीत असेही आयुक्‌तांनी नमूद केले.

ठाणे शहरात इतर अन्य प्राधिकरणांच्या अखत्यारित  देखील काही  रस्ते येतात, परंतु नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी रस्ता कोणाच्या अखत्यारित आहे हे न पाहता महापालिकेच्या माध्यमातून त्या रस्त्याची दुरूस्ती करुन घ्यावी. रस्ता कोणाचाही असो, नागरिकांना त्रास होणार नाही किंवा रस्ते खराब असल्यामुळे नाहक कोणाचा बळी जाणार नाही या दृष्टीने सदरची सर्व कामे ही युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे, कामे करण्यास दिरंगाई, निष्काळजीपणा, आळसपणा केल्यास कोणाचही चूक माफ केली जाणार नाही असेही त्यांनी नमूद केले.

रस्त्यांच्या कामांबरोबर इतर कामांकडे दुर्लक्ष करु नये

रस्त्यांच्या कामांबरोबरच शहरातील सार्वजनिक शौचालयांची जी कामे सुरू आहेत,त्याकडे लक्ष देवून सदरची कामे पूर्ण  करावीत. शौचालयांची कामे ही चांगल्या दर्जाची असावीत, कुठल्याही शौचालयांमध्ये गळती राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ओव्हरहेड टँकमध्ये नियमित पाणी राहिल हे निश्चित करावे. आवश्यक असलेली स्थापत्य कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्तांनी दिल्या.  तसेच शहरात ज्या ज्या ठिकाणी दुभाजक टाकण्यात आले आहेत ती कामे पूर्ण करावीत.. ज्या ठिकाणी दुभाजक बसविण्यात आले आहेत त्या ठिकाणी पिवळ्या पट्टे मारणे व थर्मोप्लास्ट मार्किंग करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

मेट्रो प्राधिकरणानेही कामात दिरंगाई करु नये

ठाणे शहरात मेट्रो प्राधिकरणाची कामे जी कामे सुरू आहेत त्यामुळे वेळोवेळी रस्ते खराब होत असल्याचे निदर्शनास येत आहे, त्यामुळे आज तातडीने मेट्रो अधिका-यांसमेवत बैठक घेण्यात आली. यावेळी रस्तानिहाय आढावा घेवून रस्ते दुरूस्तीच्या सूचना देण्यात आल्या. सदर कामांबाबत हे काम मेट्रो करेल की महानगरपालिका या दोन्ही यंत्रणांनी परस्पर समन्वयाने ठरविणे अपेक्षित आहे. मात्र केवळ दुसरी यंत्रणा करेल या भावनेने काम टाळले तर नागरिकांना फार मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागेल याची  जाणीव ठेवून काम पूर्ण केले जाईल हे सुनिश्चित करण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या. मेट्रो स्टेशनच्या कामामुळे जे सेवा रस्ते खराब झाले आहेत त्याची  मास्टिक, अस्फाल्टच्या सहाय्याने दुरूस्ती करुन घेण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच ज्या ठिकाणी गटारामधून पाण्याचा निचरा होत नाही ती गटारे साफ करुन घ्यावीत व ज्या ठिकाणी गटाराचे बांधकाम अपूर्णावस्थेत  ती कामे पूर्ण केली जावीत. तसेच  माजिवडा येथे  व पेपर प्रोडक्ट कंपनी येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर केबल्स पडलेल्या असून त्या देखील तातडीने उचलल्या जाव्यात अशा सूचनाही आयुक्त बांगर यांनी या बैठकीत दिल्या.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शासकीय इमारतीच्या आवारातील झाडांचे कठडे काढावेत