जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग
एपीएमसी अभियंता विभागाचा प्रताप
गटाराच्या झाकणावर धोकादायक इमारतीला टेकू
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील कांदा-बटाटा मार्केट अतिधोकादायक झाल्याने या ठिकाणी छताचे प्लास्टर पडण्याच्या घटना वरचेवर घडत आहेत. त्यामुळे येथील छतांना लोखंडी खांबांचा टेकू देण्यात आला आहे. मात्र, सदर टेकू चक्क गटाराच्या झाकणावर देण्यात आला आहे. त्यामुळे झाकण कधीही तुटून दुर्घटना होण्याची भीती व्यवत केली जात आहे.
वाशी मधील एपीएमसी आवारातील संपूर्ण कांदा-बटाटा मार्केट मधील सर्व इमारती जर्जर झाल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने या इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. मात्र, येथील व्यापाऱ्यांना बाजार समितीने पर्यायी जागा उपलब्ध करुन न दिल्याने व्यापारी स्वतःचा जीव मुठीत धरून व्यवसाय करत आहेत. विशेष म्हणजे छतांना खांबांचा टेकू देताना एपीएमसी अभियंता विभागाने चक्क गटाराच्या झाकणावर टेकू दिला असल्याने एपीएमसी अभियंता विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. १७ जुलै रोजी कांदा-बटाटा मार्केट मधील एफ १२९ आणि १३० समोरील सज्जा कोसळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे कांदा-बटाटा मार्केट मधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील सर्व इमारती धोकादायक झाल्या असून, त्यातील बहुतांश इमारतींना टेकू देण्यात आला आहे. मात्र, आमच्या दुकान समोरील स्लॅबला गटाराच्या झाकणावर टेकू दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी झाकण तुटुन काही दुर्घटना घडली तर त्यास सर्वस्वी एपीएमसी अभियंता विभाग जबाबदार असणार आहे. - मनोहर तोतलानी, कांदा-बटाटा व्यापारी - एपीएमसी मार्केट.