जानेवारी ते आतापर्यंत ‘डेंग्यू'चे २८८ संशयित रुग्ण

नवी मुंबई मध्ये डेंग्यू संशयित रुग्णांत वाढ

वाशी : सध्या पावसाची रिपरिप तर कधी ऊन सुरु असल्याने वातावरणात वारंवार बदल होत आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरात साथीचे आजार बळावत आहेत. नागरिकांना ताप, सर्दी, खोकला यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्याचसोबत डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो या आजारांनी देखील डोके वर काढले आहे. डेंग्यू आजार बळावला अजून, जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात २३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर जानेवारी पासून आतापर्यंत नवी मुंबई शहरात एकूण २८८ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील २ रुग्णांना अधिकृत  डेंग्यूची लागण झालेली आहे.

कोविड काळात लागलेली टाळेबंदी आणि नागरिकांनी स्वच्छता विषयी घेतलेली काळजी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी देण्यात आलेली भर यामुळे नवी मुंबई शहरात कोरोना व्यतिरिक्त साथीचे आजार रुग्ण कमी झाले होते. परंतु, मागील वर्षीपासून पुन्हा साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. मागील वर्षी खासगी बांधकाम कंपनी, तुर्भे, गावठाण, झोपडपट्टी विभाग, सिडको वसाहतीतील घरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्या डासांची पैदास आढळली होती. यावर्षीही हवामानात होणाऱ्या बदलामुळे नवी मुंबई शहरात सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.

सध्या आजारांवर खासगी दवाखान्यात उपचार घ्ोणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साथीच्या रुग्णांची संख्या वाढ होत चालली आहे. जून २०२२  मध्ये नवी मुंबई शहरात डेंग्यूचे  ४६ संशयित रुग्ण होते. तर जून २०२३ मध्ये ६५ संशयित रुग्ण आढळले असून, २ जणांचे निदान झाले आहे. तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २३ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी २०२३ ते जुलै २०२३ (पहिल्या आठवड्यापर्यंत) या सात महिन्यात एकूण २८८ संशयित डेंग्यू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल गॅस्ट्रोच्या रुग्णांत देखील वाढ होताना दिसत आहे. जानेवारी ते जुलै पर्यंत १०१ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून, गॅस्ट्रो रुग्णांमध्ये मागील वर्षी पेक्षा अधिक वाढ होताना दिसत आहे. मागील वर्षी जून मध्ये गॅस्ट्रोचे ३ तर यंदा २३ तसेच मागील वर्षी जुलै मध्ये २ तर यंदा जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात गॅस्ट्रोचे ७ रुग्ण आढळले आहेत. त्या तुलनेत मलेरिया आजार नियंत्रणात आहे. जानेवारी पासून आतापर्यंत मलेरिया आजाराचे १४ रुग्ण असून, जुलै मध्ये ४ रुग्ण आहेत, अशी माहिती नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या करिता स्वःतंत्र शेड्युल नुसार सुधारित वेतन दर लागु करावेत