महापालिका शिक्षक भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रतिसाद

प्राथमिक शिक्षक पदासाठी ७२२, माध्यमिक शिक्षक पदासाठी ६०५ उमेदवारांची नोंदणी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांचा या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी वाढता कल आहे. त्याकरिता या शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता लक्षात घेत महापालिका शिक्षण विभागामार्फत १० जुलै रोजी तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिक्षक नियुक्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या थेट मुलाखतीसाठी १५०० हुन अधिक शिक्षक उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या नियंत्रणानुसार, शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रय घनवट आणि शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सुव्यवस्थितरित्या केलेल्या नियोजनामुळे शिक्षक नियुक्तीसाठीची थेट कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरु झाली.

सकाळी ९ वाजल्यापासूनच शिक्षक भरतीसाठी आलेले उमेदवार महापालिका मुख्यालयासमोर रांगेत उभे हाते. त्यांच्या नोंदणीचे तसेच कागदपत्र तपासणीचे सुव्यवस्थित नियोजन शिक्षण विभागामार्फत करण्यात आल्याने मुलाखत प्रक्रिया सुरळीत सुरु झाली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राथमिक शिक्षक पदासाठी ७२२ आणि माध्यमिक शिक्षक पदासाठी ६०५ उमेदवारांची नोंदणी झालेली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या ५३ प्राथमिक आणि २३ माध्यमिक शाळा असून या शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरिता तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक नियुक्ती केली जात आहे. यामध्ये प्राथमिक विभागात मराठी माध्यमात ८८, हिंदी माध्यमात ३१, ऊर्दू माध्यमात ४ अशाप्रकारे एकूण १२३ शिक्षकांची भरती केली जात आहे. तसेच माध्यमिक विभागासाठी मराठी माध्यमात ३७, हिंदी माध्यमात ११, उर्दू माध्यमात २ आणि इंग्रजी माध्यमात १० अशा ६०  शिक्षक पदांवर तात्पुरती भरती केली जात आहे.

सदरची भरती पूर्णतः तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर असून याद्वारे नवी मुंबई महापालिका शाळांतील शिक्षकांची गरज पूर्ण केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेला उमेदवार शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने महापालिकेच्या शाळांतील शिक्षकांची गरज पूर्ण होणार असून विद्यार्थ्यांनाही उत्तम शिक्षक उपलब्ध होणार आहे. -राजेश नार्वेकर-आयुवत, नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक तंत्र ठरते आहे फायदेशीर