‘नवी मुंबई'तील पार्किंग समस्या सोडविण्यासाठी पालिका आयुवतांना पुढाकार

आयुवत नार्वेकर यांच्याकडून पार्किंग योग्य जागांच्या तपशीलाचा आढावा

नवी मुंबई :  नवी मुंबई शहरातील पार्किंग समस्येची सोडवणूक करण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नियोजनबध्द पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आयुवतांनी सातत्याने आढावा बैठका घेत वाहतूक पोलीस विभागाच्या सहयोगाने नवी मुंबई शहराचे पार्किंग धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही केली जात आहे.

या अनुषंगाने विशेष बैठक घेत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी २८ जून रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार विभागीय पातळीवर स्थानिक वाहतूक पोलिसांसमवेत करण्यात आलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास आलेल्या पार्किंगयोग्य जागांच्या तपशीलाचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, मालमत्ता विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर, वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.   

सदर बैठकीत आयुक्त नार्वेकर यांच्यामार्फत विभाग अधिकारी यांनी त्या विभागातील वाहतूक पोलीस निरीक्षक यांच्या समवेत संयुक्त आढावा घेऊन नो-पार्किंग झोन, सम-विषम पार्किंग, समांतर पार्किंग झोन निश्चित करण्याबाबत आणि ज्या ठिकाणी असे झोन निश्चित केलेले आहेत, त्या ठिकाणची सद्यस्थिती तपासण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पाहणी करुन सादर करण्यात आलेल्या पार्किंगयोग्य जागांवर बैठकीत विचारविनीमय करण्यात आला.

सध्या पार्किंग होत असलेल्या आणि सुचविलेल्या जागांबाबत भविष्यात पुढे कोणतीही अडचण येऊ नये याकरिता एक पथक निर्माण करण्यात यावे. या पथकामार्फत पार्किंगच्या दृष्टीने कोणते रस्ते अद्याप राहिले आहेत, तसेच नो-पार्किंग फलक आहेत; मात्र तिथे पार्किंग होत आहे. रिक्शा स्टँड-टॅक्सी स्टँड असलेल्या; पण सूचीत नसलेल्या जागा अशा विविध गोष्टींची अधिक बारकाईने तपासणी व्हावी. या पथकामध्ये त्या त्या विभाग क्षेत्रातील कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, विभाग अधिकारी तसेच वाहतूक पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असावा, असे निश्चित करण्यात आले. सदर पथकाने काय तपासणी करावयाची याबाबत चेकलिस्ट तयार करुन कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले. पथकाने आपला अहवाल १ आठवड्यात १२ जुलै पर्यंत सादर करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले असून या नियोजित अहवालावरील चर्चात्मक बैठकीस प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करावे, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बैठकीत सूचित केले.

जागा निश्चित करण्याप्रमाणेच सदर बैठकीत पार्किंगच्या जागांचे परिचलन करण्यासाठी कंत्राटदार पुढे यावेत यादृष्टीने पार्किंग जागांचा बेसरेट सिडकोप्रमाणे असण्याबाबत विचार करण्यात आला. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेने निश्चित केलेल्या दराप्रमाणेच कंत्राटदार पार्किंग चार्जेस घेईल. अतिरिक्त कोणतीही रक्कम घेणार नाही, याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला. जागानिश्चिती आणि बेसरेट निश्चितीनंतर नव्याने कंत्राट काढण्यात येईल, याविषयी विचारविनीमय झाला.

विभागीय पातळीवर पाहणीअंती सादर केलेल्या पार्किंगच्या जागांची उपयोगिता तपासणे आणि त्यामधून सुटलेल्या जागा सूचविणे असे दुहेरी काम नव्याने स्थापन केले जाणारे पथक करणार आहे. त्याचप्रमाणे जागा निश्चित करण्यासोबतच त्या जागेवर किती दुचाकी आणि किती चारचाकी वाहनांचे पार्किंग होऊ शकते, याचाही तपशील सादर करावा. सदर सर्व जागांची आखणी गुगल मॅपवर करण्याचे निर्देश देण्यात आले असून सदर काम अत्यंत काळजीपूर्वक करण्याच्या सूचना आयुवत नार्वेकर यांनी संबंधित घटकांना दिल्या.

बृहन्मुंबई, पुणे आणि नाशिक महापालिकेचे पार्किंग धोरण कार्यान्वित असून त्यांचाही अभ्यास करावा. पुढील बैठकीत त्याविषयी माहिती मालमत्ता विभागामार्फत सादर करण्यात यावी. ‘सिडको'कडून पार्किंगसाठी आलेल्या भूखंडांवरील पार्किंग सुविधेबाबत अभियांत्रिकी विभागाने नियोजन करावे. नवी मुंबई महापालिकेचे पार्किंग धोरण तयार करताना ते सर्वंकष असावे. तसेच ते इतरांसाठीही मार्गदर्शक ठरावे अशाप्रकारे प्रत्येक बाबीचा बारकाईने सांगोपांग विचार व्हावा. नवी मुंबईकर नागरिकांना आणि नवी मुंबईला भेट देणाऱ्या प्रवाशांना पार्किंग सुविधाजनक होईल, यासाठी आपले प्राधान्य आहे. - राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण नगरपरिषदचे मीनाताई ठाकरे वाचनालयातील अभ्यासिकेमध्ये उदंड प्रतिसाद