जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग
महागलेल्या भाज्यांना रानभाज्यांचा दिलासा
आरोग्यवर्धक रानभाज्यांना बाजारात मागणी
वाशी : सध्या पडत असलेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊन भाज्या महागल्या आहेत. तर दुसरीकडे याच पावसात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या रानभाज्या आता बाजारात दाखल होऊ लागल्यामुळे शाकाहारी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. डोंगर भागातून बाजारात दाखल होणाऱ्या गुणकारी रानभाज्या या आरोग्यवर्धक असल्याने त्यांना अधिक मागणी आहे.
पावसाळा सुरु झाल्यानंतर आठवडाभरात रानभाज्या बाजारात दाखल होतात. वर्षातून फक्त दोन महिन्यांच्या हंगामात मिळणाऱ्या या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी गरीब, मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू घरातीलसुध्दा लोकांचा या भाज्या खरेदी करण्याकडे कल असतो. शाकाहाराबरोबरच मांसाहारी लोकही या भाज्या आवर्जुन खरेदी करताना दिसतात. हातावर पोट असणाऱ्यांसाठी आणि वर्षभर गावठी भाजी विकणाऱ्यांसाठी विशेषतः आदिवासींसाठी पावसाळी कालावधी एक पर्वणी ठरते. निसर्ग स्वतःच रानभाजी पिकवून देत असल्यामुळे कोणताही खर्च न करता केवळ कष्टाने भाजी मिळवून ती बाजारात आणावी लागते. या रानभाज्या औषधी आणि गुणकारी असल्याने त्या खरेदीसाठी खवय्यांची मोठी झुंबड उडत असते.
पाऊस सुरु झाल्यानंतर माळरानावर आणि जंगलात विविध औषधी भाज्या उगवतात. शेवळे, टाकळा, कोळा, भारंगा, कंटोळी, कुडी, आकूर, कुलू आदि औषधी आणि गुणकारी भाज्या आदिवासी महिलांबरोबरच इतर समाजातील कुटुंबांना रोजगार मिळवून देतात. या भाज्यांना बाजारात मागणी असून, त्यांच्या विक्रीतून दिवसाला ४०० ते ५०० रुपये मिळत असल्याचे रानभाज्या विकणाऱ्या अनिता गवते या महिलेने सांगितले. रानात उगवणाऱ्या या भाज्या विविध विकारांवर गुणकारी असल्याचे मानले जाते.
वयोवृध्द माणसे या भाज्या वर्षांतून एकदा तरी खाव्यात यासाठी आग्रही असतात. या भाज्या वाटा किंवा जुडीच्या स्वरुपात विक्रीला येतात. साधारणपणे वाटा १५ ते २५ रुपये, तर जुडीची किंमत त्यांच्या आकारावर अवलंबून असते. यातील पालेभाज्या २० रुपयांपासून खरेदीसाठी बाजारात उपलब्ध असतात. वर्षभर मेथी, आळू, पालक, शेपू, लाल माठ यासारख्या नेहमीच्या पालेभाज्या खाणारे आपल्यापैकी अनेक जण पावसाळ्यात मात्र रानभाज्यांची चव चाखतात.
नवी मुंबईत येणाऱ्या रानभाज्यांची आवक रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण, आदि भागातून मोठ्या प्रमाणावर असते. नवी मुंबईतील असलेल्या मोजक्याच आदिवासी पाड्यातून देखील बाजारांमध्ये भाज्या विक्रीसाठी येतात. नवी मुंबईतील गाव-गांवठाणात बुहुतेकांना या रानभाज्यांची माहिती असल्याने पावसाळी हंगामात रोज त्यांच्या जेवणात एखादा लज्जतदार रानभाजी असतेच. तसेच सध्याच्या सोशल मिडीयामुळे रानभाज्या आता जास्तीत जास्त लोकांना माहीत होऊ लागल्या आहेत. त्यांच्या पाककृती टिव्ही चॅनल्सवर दाखवल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे हल्ली लोकांना याची माहिती होऊ लागली. या भाज्या खतांवर तयार होत नाहीत. रानभाज्या आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे जाणकार मंडळी कडून सांगितले जाते.
रानभाज्यांची नावेः रानकेळी, चायवळ, शिडाचे बोख, ससेकान, नारेली, करटुली, कुड्याची फुले, कोरड, चिवळी, चिंचुरडा, शेवाळी, मोखा, रानकेळी, कुरडू, फोडशी, कोरलं, कवळा, आंबट वेल, दिंडा, वाघ्ोटी, टेरी, आळू, भोपरं, भुईछत्री, अळंबी, भोपळा पाने, इकरा, अंबाडा फळे, माठ देठ, कवळा अशा अन्य पालेभाज्या आणि फळ वर्गातील भाज्या आहेत.
वर्ष्रातून फक्त दोनच महिने रानभाज्यांची चव चाखता येते. तसेच या भाज्या बहुगुणी असल्याने आमच्या आहारात समावेश असतोच. महाग जरी असली तरी रानभाजी खरेदी केली जाते. - शुभांगी पाटील, गृहिणी, तुर्भे गांव.
आम्ही उरण येथून दरवर्षी रानभाज्या घेऊन नवी मुंबईतील गावागावात भरणाऱ्या बाजारात विक्रीस घेऊन येतो. या भाज्यांचे विशेष म्हणजे इतर भाज्या लवकर खरेदी केल्या जात नाही; पण रानभाज्या अर्ध्या ते पाऊण तासात विकल्या जातात. तसेच काही ग्राहक आवर्जुन भाज्या घेऊन या असे आम्हाला सांगतात. - तारा भगत, भाजी विक्रेती.