के व्हिला येथील पूल वाहतुकीसाठी खुला

वाहतूक कोंडीतून दिलासा देणारा के व्हिला येथील नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी खुला

ठाणे : होली क्रॉस शाळा ते सेंट्रल मैदान या मोक्याच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून दिलासा देणारा के व्हिला येथील नाल्यावरील पूल शनिवार, ०१ जुलै पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे, मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी दूर होणार असून पावसाळ्यात कचरा साठून कायम तुंबणारा नाल्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

 पावसातील पूरस्थिती आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन राबोडी, के व्हिला येथील नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतला. तसेच हे काम जलद पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, ठाणे महानगरपालिकेने जानेवारी २०२३ मध्ये नाल्यावरील पूल रुंदीकरण काम हाती घेतले होते.

पुलाची लांबी २० मीटर असून रुंदी २१ मीटर आहे. या प्रकल्पासाठी २.७५ कोटी रुपयांचा एकूण खर्च अपेक्षित आहे. तूर्तास, या पुलावरील एक मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूकीसाठी रस्ता खुला झाला आहे. दुसरी जलवाहिनी पावसाळ्यानंतर स्थलांतरित केली जाणार आहे.

राबोडी - के व्हिला येथील नाल्याच्या प्रवाहासाठी जुन्या रस्त्यावर ब्रिटिशकालीन कमान (आर्च) पद्धतीचे गाळे होते. सन १९९५-९६ मध्ये या रस्त्याचे तसेच पुलाचे रुंदीकरण करण्यात आले होते. मात्र, मध्यभागी असलेल्या नाल्यावरील पुलाचा भाग तसाच कायम होता. मुळात अरुंद असलेले हे गाळे त्यावरून गेलेल्या सेवा वाहिन्यांमुळे आणखी अरुंद झाले होते. त्यात कचरा अडकून पावसाळ्यात या भागात पाणी साठत होते. नाल्याचे गाळे मोकळे झाल्याने पाण्याचा जलद निचरा होण्यास मदत होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत साकारली पहिली ‘थिंक बिग स्पेस”