नेरुळ मधील कॉस्मोपॉलिटन-२ सोसायटीतील १०९ कुटुंबांचा जीव टांगणीला

सोसायटीतील अतिक्रमणांकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; पदाधिकाऱ्यांची आयुक्तांकडे धाव

नवी मुंबई : नेरुळ येथील कॉस्मोपॉलिटन-२ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चक्क स्ट्रक्चरल ऑडीट अहवालातून २७ रो-हाऊसेस आणि २० दुकाने वगळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परिणामी, वास्तव्यास अतिशय धोकादायक म्हणून महापालिकेनेच जाहीर केलेल्या या सोसायटी इमारतीचा पुनर्विकास रखडला गेला आहे. एकीकडे महापालिकेने येथील इमारतीत राहणाऱ्या १०९ कुटुंबांना इमारत तातडीने खाली करण्यासाठी सोसायटीच्या गेटवर फलक लावला आहे. तर दुसरीकडे आर्थिक लाभासाठी या इमारतीचा पुनर्विकास रखडवण्याचा ठेका महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांंनी घेतल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे कॉस्मोपॉलिटन सोसायटी-२ मधील २७ रो-हाऊसेस आणि २० दुकानांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाला अभय देणाऱ्या अतिक्रमण विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसह सोसायटीतील रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

‘सिडको'ने नेरुळ, सेक्टर-१७ येथील १८२ क्रमांकाचा भूखंड निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी भाडेकरारावर कॉस्मोपॉलिटन-२ पुनीत पार्क यांना दिला आहे. सदर भूखंडावर तळमजला अधिक ७ माळ्याची इमारत ज्यामध्ये ए, बी, सी आणि डी अशा चार विंग आहेत. याशिवाय सदर भूखंडावर २७ रो-हाऊसेस आणि २० दुकाने उभारण्यात आली आहेत. संपूर्ण भूखंडावर निर्माण करण्यात आलेल्या इमारती,रो-हाऊसेस आणि दुकाने यांची कॉस्मोपॉलिटन-२ को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. या नावाने सदर संस्था निबंधक सहकारी संस्था, सिडको यांच्याकडे सन-१९९९ मध्ये नोंदणीकृत आहे.

कॉस्मोपॉलिटन हौसिंग सोसायटीच्या आवारातील २७ रो-हाऊसेसमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्याबाबत अनेकवेळा संस्थेने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे लेखी तक्रारी करुन देखील त्याकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दुर्लक्ष केले आहे. अतिक्रमण विभागाचे तत्कालीन उपायुक्त, कनिष्ठ अभियंता आणि संस्थेच्या आवारात अतिक्रमण करणारे रो-हाऊस मालक यांच्यात असलेले आर्थिक संबंध यामुळेच संस्थेच्या आवारातील अतिक्रमण हटविण्याऐवजी ते अधिकृत करण्यासाठी महापालिका अधिकारी गेले काही वर्षे प्रयत्न करत असल्याचा आरोप सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आर्थिक नातेसंबंधातूनच महापालिका अधिकारी या सोसायटीतील अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देत असल्यामुळेच सोसायटीतील अनधिकृत बांधकामाबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता असे कुठलेही तक्रार अर्ज महापालिकेच्या अभिलेखात उपलब्ध नाहीत, असे नेरुळ ब-विभाग कार्यालयातर्फे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

कॉस्मोपॉलिटन-२ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील संपूर्ण बांधकामे धोकादायक असल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन महापालिकेकडे अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र, त्यावर निर्णय घेण्यासाठी अतिक्रमण विभागाने तब्बल नऊ महिन्यांचा कालावधी घेतला. संस्थेने सादर केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीट अहवालावर निर्णय देताना कॉस्मोपॉलिटन सोसायटीतील २७ रो-हाऊसेस आणि २० दुकाने वगळून उर्वरित चार विंग असलेली ७ मजली इमारती सी-१ प्रवर्गात (म्हणजेच राहण्यास अति धोकादायक, अयोग्य आणि तत्काळ निष्कासित करणे) मोडत असल्याने महापालिकेने धोकादायक इमारतींच्या यादीत या सोसायटीचे नाव नुकतेच प्रसिध्द केले आहे. तसेच याबाबतची नोटीस महापालिकेने २३ जून रोजी सोसायटीच्या गेटवर देखील लावली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्लॅबचे प्लास्टर कोसळलेल्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा वापर थांबविण्याच्या सूचना