महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकत्रित सेवाप्रवेश नियमावली मंजूर

ठाणे महानगरपालिकेच्या सेवाप्रवेश नियमावलीस राज्यशासनाची मान्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कर्मचाऱ्यांनी मानले आभार

ठाणे : सन 1982 मध्ये ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाली. ठाणे हे शहर मुंबईलगत असल्याने ठाण्यात राहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. नव्याने विकसित झालेल्या घोडबंदर विभागामुळे नागरिकरणामध्ये झपाट्याने वाढ होत आहे, यानुसार नागरिकांना मुलभूत सेवासुविधांसह मानदंड ठरणारे प्रकल्प राबविणे, केंद्र व राज्यशासनाचे महत्वाचे उपक्रम, संस्था, प्रकल्प यामुळे पायाभूत सुविधा नियमित व गतीमान पध्दतीने उपलब्ध करुन देता याव्यात यासाठी महापालिकेला प्रशासन म्हणून भूमिका पार पाडत असताना महापालिकेच्या आस्थापनेवरील पदे निर्माण करणे आवश्यक होते. तसा प्रस्ताव महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी राज्यशासनास सादर केला होता, त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दिनांक 27 जून 2023 रोजी मान्यता मिळाली असून आगामी काळात ठाणेकरांना अधिक गतिमानतेने सेवासुविधा उपलब्ध होणार असून महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले.

            सन 1982 मध्ये स्थापन झालेली ठाणे महानगरपालिका आज 'ब' वर्ग दर्जाची झाली आहे. सद्यस्थिती महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्या असून एकूण क्षेत्रफळ 147 चौ.कि.मी इतके आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे महानगरपालिकेची लोकसंख्या 18.41 लाख असून आज रोजी अंदाजे 27 लाख इतकी आहे. या लोकसंख्येला सेवासुविधा पुरवित असताना निश्चितच महापालिकेच्या आस्थापनेवर अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक होण्याकरिता सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण अंतर्गत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

            ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील पदे ही महापालिकेच्या वेळोवळी झालेल्या  मा. सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने निश्चित करण्यात येत होती व त्या - त्या पदांसाठी असलेल्या सेवाशर्ती व नियम हे महासभेच्या मान्यतेने करण्यात येत होते. अशा सेवा शर्थींना पदनिहाय    त्या- त्या वेळी शासनाकडून मान्यता घेण्यात येवून अशी पदभरती पदोन्नती/ नामनिर्देशनाने करण्यात येत होती. विविध कालावधीत आवश्यकतेनुसार त्या त्या पदांचे सेवाप्रवेश, नियम निर्धारित झालेले असल्याने त्यामध्ये विविधता दिसून येत होती. यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सर्व पदांकरिता एकात्मिक अशी सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण, नियम असणे आवश्यक होते, याबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील पदांकरिता सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण, नियम तात्काळ निश्चित करणेबाबत निर्देश दिले होते.

या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेमार्फत महापालिकेच्या आस्थानेवरील विविध संवर्गाकरिता सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण तयार करुन मा. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने शासनास सादर करण्यात आले होते, यास शासनाने दिनांक 27 जून 2023 रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता सर्व पदांकरिता मान्यता मिळाली असल्याने यामध्ये आगामी काळात एकसूत्रीपणा येणार असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या सेवा नियम 2023 शासनाने मंजूर केल्यामुळे महापालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्याबरोबरच पदोन्नती व आश्वासित प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना महापालिकेमार्फत उत्तम दर्जाच्या सेवा कमी वेळेत सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

तसेच ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका तर्फे ‘लेप्टोस्पायरोसिस'चा धोका टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन