पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांना आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट

भर पावसात महापालिका आयुवतांची नवी मुंबई क्षेत्र पाहणी
 

नवी मुंबई : २८ जून रोजी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु होती. पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत होते. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी भेटी देऊन विशेषत्वाने पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांची शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली.

२३ जून रोजी मोठ्या प्रमाणात पावसास सुरूवात झाल्यानंतर आयुक्त नार्वेकर यांनी लगेचच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका मुख्यालयातील तात्काळ कृती केंद्र तसेच विभाग कार्यालये आणि अग्निशमन केंद्रे येथील आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज आहेत. झाडे अथवा झाडांच्या मोठ्या फांड्या वारापावसामुळे पडल्यास त्याठिकाणी जलद पोहोचून रहदारीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्ोणे, मोठा पाऊस आणि भरतीची वेळ जुळून आल्यास पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणचे पाणी उपसा पम्प्स कार्यान्वित करणे, भिंत पडणे अथवा इतर आपत्ती प्रसंगी तत्पर सेवा पुरविणे यासाठी ‘आपत्ती व्यवस्थापन'ची मदत पथके आणि अग्निशमन दल अथक कार्यरत झाले.
त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश नार्वेकर यांनी २८ जून रोजी सीबीडी, सेक्टर-६ मधील मलउदंचन केंद्र आणि मार्केट परिसर, हर्डिलिआ कंपनीजवळील सायन-पनवेल महामार्गाखालून जाणारा नाला, सानपाडा परिसर, सेक्टर-१७ वाशी अरेंजा कॉर्नर नाला परिसर, वाशी सेक्टर-४, ५, ६ आणि ९ चा परिसर, सेक्टर-२१ तुर्भे परिसर अशा विविध ठिकाणी भेटी देत अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले.

सायन-पनवेल महामार्गावरुन वाशी, सेक्टर-७ कडे उतरण्याच्या रस्त्यावर २५ जून रोजी जोरदार पावसात पाणी साचल्याने त्या ठिकाणी त्वरित चर खोदून साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करुन देण्यात आली होती. त्याचप्रमाणे वाशी, सेक्टर-५ येथे एफ-१ टाईपच्या इमारतींसमोरील गटारावरील स्लॅब कोसळला होता. सदर भागांची आयुक्त नार्वेकर यांनी पाहणी करुन अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यावेळी सेक्टर-९ वाशी येथील व्यापारी वर्गाने मागील ४ दिवसात सतत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळूनही त्याठिकाणी पावसाळ्यापूर्वी बांधलेल्या कल्व्हर्टमुळे यावर्षी पाणी साचून राहिले नाही, याबद्दल आभार व्यक्त केले. नवी मुंबई शहर समुद्रसपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने काही सखल भागात अतिवृष्टी आणि भरतीची वेळ जुळून आल्यास पाणी साचते. अशीच परिस्थिती सेक्टर-९, वाशी येथील होती. त्यावर अभियांत्रिकी विभागाने अभ्यास करुन उपाययोजना केली आहे. अशाच प्रकारे इतरही पाणी साचण्याच्या संभाव्य १४ ठिकाणी उपाययोजना शोधाव्यात, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सूचित केले.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून सर्व यंत्रणा सतर्क आहेत. या कालावधीत कोणीही आपले मोबाईल बंद ठेवू नयेत, असे निर्देश महापालिका अधिकारी-कर्मचारीवृंदास दिलेले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी नजिकच्या विभाग कार्यालयास अथवा महापालिका मुख्यालयातील तात्काळ कृती केंद्रास ०२२-२७५६७०६०/६१ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा १८००२२२३०९-१८००२२२३१० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. - राजेश नार्वेकर, आयुक्त - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेच्या ढिसाळ कामकाजामुळे रहिवाशांमध्ये नाराजी