ठाण्यातील खाडी किनारा व तलावांची जिल्हास्तरीय समितीने केली पाहणी

“चला जाणुया नदीला” अभियान

 ठाणे  : ठाणे महापालिकेने नागरिकांकरिता मुंब्रा-पारसिक,रेतीबंदर घाट, साकेत बाळकुम व कोपरी घाट येथे उत्तम सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. गणेशोत्सव,नवरात्रौत्सव तसेच इतर धार्मिक कार्यासाठी विसर्जन घाटावर नागरिक येत असतात. नागरिकांच्या सोईसाठी विसर्जन घाटावर सूचना फलक व निर्माल्य कलश उपलब्ध करावेत अशा सूचना “चला जाणुया नदीला” या नदी संवर्धन अभियाना अंतर्गत महाराष्ट्र शासनाद्वारे नियुक्त जिल्हास्तरीय समितीच्या समन्वयकांनी पालिकेला दिल्या आहेत.

भारताच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षात सुरू झालेल्या “चला जाणुया नदीला” या नदी संवर्धन अभियाना अंतर्गत महाराष्ट्र शासनाद्वारे नियुक्त जिल्हास्तरीय समितीच्या समन्वयक व जलनायिका प्रा.डॉ.स्नेहल दोंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरूवारी (22.06.2023) ठाणे महानगरपालिका व इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत खाडी किनारा व तलावांची पाहणी केली. यावेळी ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान उपस्थित होत्या.

            पाहणीच्या वेळी ठाणे महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या वॉटर फ्रंटच्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांना खाडी व परिसरातील जैवविविधतेबाबत माहिती देण्याकरिता तेथील परिसरात माहिती केंद्र उभारण्याबाबत सुचना केल्या.

ठाणे महानगरपालिकेने भाडेतत्वावर दिलेल्या काही तलावांची उदा.घोसाळे तलाव, हरियाली तलाव पाहणी देखील त्यांनी केली. महापालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या योजनांमुळे तलाव व तलाव परिसर स्वच्छ आणि सुंदर राहत असून शाश्वतपणे त्यांचे संवर्धन होत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. काही नाल्यांमधुन सांडपाणी  खाडीत जाऊन प्रदूषण होत असल्याने त्याचे स्वच्छतेच्या प्रक्रियेबाबत ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा तसेच STP द्वारे प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने योजना आखावी असे त्यांनी सुचित केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रवेशासाठी शासकीय दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालक वर्गाची ससेहोलपट